झी मराठी वाहिनीवर तू चाल पुढं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेतील अश्विनीला तिच्या नवऱ्याची, सासूची साथ मिळत नाही. तरी ती तिच्या मुलींच्या आणि सासऱ्यांच्या मदतीने यशाची एक एक पायरी पुढे चढताना दिसणार आहे. नुकतेच बाबाने केलेल्या भाकितावरून श्रेयस नाही तर तूच तुझ्या हिंमतीवर घर बंधू शकते असे म्हटले आहे. बाबांच्या या भाकितावर अश्विनीला विश्वास नाही. तरी तिच्या मैत्रिणीला यात काहीतरी तथ्य असल्याचे वाटत आहे. त्यामुळे प्राजक्ता आपल्या मैत्रिणीला म्हणजेच अश्विनीला नक्कीच प्रोत्साहन देणार याची खात्री आहे. अश्विनीच्या या खास मैत्रिणीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री स्नेहा माजगावकर हिने.
स्नेहा माजगावकर ही मराठी नाट्य, मालिका अभिनेत्री आहे. एका लग्नाची तिसरी गोष्ट या लोकप्रिय मालिकेतून स्नेहा झळकली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयातून स्नेहाने आजवर प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. कट्टी बट्टी, माझे पती सौभाग्यवती, तुझा धर्म कोणचा?, ह्या साल्या एनर्जीचं करायचं काय? अशा मालिका आणि नाटकांमधून तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. स्नेहा माजगावकर ही साताऱ्याची, अभिनेता सुहास शिरसाट सोबत तिने लग्नाची गाठ बांधली. अनिता दाते सोबत या दोघांची चांगली मैत्री आहे. सुहास शिरसाट हा मूळचा बीड जिल्ह्यातला. मुंबईत येऊन त्याने मालिका, चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे सुहासला अमाप लोकप्रियता मिळाली.
दत्ताच्या भूमिकेमुळे तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. मालिकेत कोकणी भाषेचा बाज असल्याने सुरुवातीला त्याने त्याच्या पद्धतीने डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र हळूहळू ही भाषा अवगत करून घेतल्यानंतर सराईतपणे आपले संवाद म्हणू लागला. स्नेहा आणि सुहास शिरसाट यांनी सेक्सी टाईम या वेबसिरीजमध्ये एकत्रित काम केले. राजू सावंत हे तू चाल पुढं या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. सुहासने त्यांच्यासोबत काम केले असल्याने स्नेहाला देखील या मालिकेमुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अभिनेत्री दीपा परब अश्विनीची भूमिका साकारत आहे.
स्नेहाला तिच्या मैत्रिणीची भूमिका निभावताना खूप दडपण आले होते. दिपाने एवढे वर्षे काम केले आहे त्यामुळे स्नेहाचा मनात भीती होती. परंतु पहिल्याच भेटीत माझी भीती कुठल्या कुठे गेली असल्याचे स्नेहा सांगते. मैत्रिणीचा रोल करताना कम्फर्ट झोन असणे गरजेचे असते आणि तो तुझ्याकडून मिळाला असे ती दीपाला म्हणते. या दमदार भूमिकेसाठी स्नेहा माजगावकर हिचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!