आजवर मराठी सृष्टीला अनेक दिग्गज कलाकार लाभले आहेत त्यातीलच एक म्हणजे दिवंगत अभिनेते आत्माराम भेंडे. अभिनयाचे कुठलेही आढेवेढे न घेता केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचे काम आत्माराम भेंडे यांनी चोख बजावले होते. चित्रपट, नाटक, मालिका आणि जाहिरात क्षेत्रातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. आत्माराम भेंडे यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दलचा थोडक्यात आढावा घेऊयात. ७ मे १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला, कोकणातील अरोंदे हे त्यांचं मूळ गाव. आपल्या कारकिर्दीत ६ दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्राला मोठे योगदान दिले होते. इंडियन नॅशनल थिएटर मधून त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरु केला.
मराठी सृष्टीत ते सगळ्यांचे बापू म्हणूनच परिचयाचे झाले होते. झोपी गेलेला जागा झाला हे त्यांचं नाटक तुफान चाललं. आम्ही दोघे राजा राणी, बाळा जो जो रे, यंदा कर्तव्य आहे, दिनूच्या सासूबाई राधाबाई, मन पाखरू पाखरू, तरुण तुर्क म्हातारे अर्क. तुज आहे तुजपाशी दूरदर्शनवरील मालिका आणि लगे रहो मुन्नाभाई अशा चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांनी आजोबांच्या, चरित्र तसेच विनोदी ढंगाच्या भूमिका साकारल्या. १९८१ सालच्या ६१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी उतारवयातही दिलेला उत्स्फूर्त सहभाग तरुणांना लाजवणारा होता. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी आत्माराम भेंडे यांचे निधन झाले. डॉ आशा भेंडे या आत्माराम भेंडे यांच्या सहचारिणी.
आशा यांनी देखील एशियन पेंट सारख्या जाहिरातीतून काम केले होते. अवॉर्ड विनिंग ऍक्टरेस म्हणूनही त्या ओळखल्या जात. त्या उच्चशिक्षित ट्रिपल एमए आणि पीएचडी धारक होत्या. आत्माराम भेंडे आणि आशा यांचा मुलगा नंदू हे संगीतकार, गायक आणि अभिनेते होते. वेगवेगळ्या बँड साठी त्यांनी कामं केली आहेत. मराठीतील पहिले रॉकस्टार अशी त्यानी ओळख मिळवली होती. १९८० मध्ये नंदू भेंडे यांनी डिस्को डान्सर या हिंदी चित्रपटाचे पार्श्वगायन केले, गोल्ड डिस्कचे ते मानकरी ठरले होते. आर डी बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. सोनी टीव्हीवरची चमत्कार, दूरदर्शनवरील चंद्रकांता, झी ची जिना इसी का नाम है, दायरे यासारख्या काही मालिकांनाही संगीत दिले.
११ एप्रिल २०१४ रोजी नंदू भेंडे यांचे निधन झाले. त्यांच्या संगीताचा वारसा मलगा अक्षय भेंडे पुढे चालवताना दिसतो. अक्षय हा नंदू भेंडे आणि उषा यांचा मुलगा तर स्वर्गीय आत्माराम भेंडे यांचा नातू. उषा भेंडे या फ्रिलांसर रायटर तसेच एडिटर आहेत. अक्षय मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असून त्याला फुटबॉल आणि संगीत क्षेत्राची आवड आहे. तो नॅशनल लेव्हल फुटबॉल खेळला असून वडिलांप्रमाणे गायन आणि संगीताची आवड आहे. त्याने काला घोडा आर्टस् फेस्टिव्हल आणि हार्ड रॉक कॅफे मध्ये सिंगर आणि गिटारिस्ट म्हणून काम केले आहे. साऊंड क्लाउड डॉट कॉम हे त्याचं रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. चारवी केन हिच्यासोबत अक्षय विवाहबद्ध झाला. चारवीला सायकलिंगची आवड आहे, जगभरात होणाऱ्या सायकलिंगच्या स्पर्धेत ती नेहमी सहभाग घेते.