स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ म्हणजेच साजिरीचा भाऊ रोहन पाटीलची भूमिका साकारली आहे “सृजन देशपांडे” ह्याने. मालिकेतील रोहन सुरुवातीला विरोधी भूमिका साकारताना दिसला. त्याच्या सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळाली. सृजन बद्दल जाणून तुम्हाला नक्कीच कौतुक वाटेल, सृजन येळवण गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध समाजसेवक, राजकीय व्यक्तिमत्व आणि शिक्षणप्रेमी असलेल्या चंद्रकांत देशपांडे यांचा नातू आहे. एवढेच नाही तर प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते “राजेश देशपांडे” यांचा तो मुलगा आहे.
राजेश देशपांडे यांनी जवळपास ३ वर्षानंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलेले पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेत त्यांची एन्ट्री झाली आहे. अभिनेता आनंद काळे यांनी साकारलेली यशवंत सरदेशमुखची भूमिका इथून पुढे राजेश देशपांडे साकारताना दिसणार आहेत. आनंद काळे सध्या माझी तुझी रेशीमगाठ आणि लेक माझी दुर्गा या दोन्ही मालिकेत सक्रिय होते. मात्र लेह लडाख ट्रिप आणि व्यस्त शेड्युलमुळे तारखा जुळून येत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी लेक माझी दुर्गा या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. म्हणून ही भूमिका आता राजेश देशपांडे यांच्याकडे आली आहे.
अर्थात आनंद काळे एक उत्तम अभिनेते आहेत पण केवळ वेळ मिळत नसल्यानेच त्यांनी या मालिकेतून काढता पाय घेतला असे राजेश देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. राजेश देशपांडे आणि आनंद काळे हे खूप चांगले मित्र आहेत, ही भूमिका आता राजेश साकारणार म्हटल्यावर आनंद काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुढचं पाऊल, कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक, करून गेलो गाव, हिमालयाची सावली, धुडगूस, धनंजय माने इथेच राहतात अशा अनेक सुंदर कलाकृतींमधून राजेश देशपांडे यांनी अभिनय तसेच दिग्दर्शन केले आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता ते लेक माझी दुर्गा मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत.
लेक माझी दुर्गा या मालिकेचे दिग्दर्शन दिनेश घोगळे यांनी केलं आहे. दिनेश घोगळे यांनी राजेश देशपांडे यांच्या मालिकांमधून सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळाल्याने राजेश देशपांडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजेश देशपांडे यांची मालिकेत एन्ट्री झाल्याने प्रेक्षक देखील आता खुश झाले आहेत. मालिकेतील पुनःपदार्पणासाठी आणि यशवंत सरदेशमुखची भूमिकेसाठी राजेश देशपांडे यांना मनःपूर्वक शुभेच्छा.