झी मराठीवरील लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवले होते. गावरान बाज असलेल्या या मालिकेतील जिजी चे पात्र विशेष लक्षवेधी ठरले होते. जिजीची भूमिका साकारणाऱ्या कमल ठोके यांचे १४ नोव्हेंबर २०२० रोजी दुःखद निधन झाले होते. कमल ठोके या कर्करोगाने त्रस्त होत्या. बंगलोरला त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांच्या निधनाची बातमी मराठी सृष्टीला हेलावून सोडणारी ठरली होती. लागीरं झालं जी या मालिकेच्या त्यांच्या अनेक आठवणी आहेत. आजही मालिकेतील सहकलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची नेहमीच आठवण काढताना दिसतात. अशातच मालिकेची निर्माती म्हणजेच श्वेता शिंदे हिने एक छानशी स्टोरी शेअर करून जिजींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
जिजी म्हणजेच कमल ठोके यांनी मालिकेत काम करत असताना श्वेता शिंदेला एक साडी भेट म्हणून दिली होती. ही साडी एकदा तरी नेसशील ना? मला तुला या साडीत पहाचंय असे त्या म्हणाल्या होत्या. आज जिजींच्या आठवणींना उजाळा देत श्वेताने ती साडी नेसली आणि फोटो सहित एक खास आठवण शेअर केली. श्वेता म्हणते की, आजची ही साडी माझ्यासाठी खास आहे. त्यामागे कारणही तसच आहे. लागिरं झालं जी मधील आपल्या सर्वांच्या लाडक्या जीजींनी ही साडी मला गिफ्ट केली होती. ही साडी देताना त्या मला म्हणाल्या होत्या. “एकदा तरी नेसशील ना ही साडी?” मला ह्या साडीत पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती. खरतर ही साडी नेसून, छान तयार होऊन मला त्यांच्यबरोबरच फोटो काढायचे होते.
पण तो योग कधी आलाच नाही, त्यापूर्वीच जीजी आपल्याला सोडून गेल्या. पण त्यांनी दिलेली ही साडी आजही मला त्यांच्या मायेची ऊब देते. ही साडी जेव्हा मी नेसले तेव्हा सतत त्या माझ्या आजूबाजूला असल्याचा भास मला जाणवत होता. त्यांच्याकडे पाहिलं की नेहमी त्यांच्या डोळ्यात मला माझ कौतुकच दिसायचं. मी साताऱ्याची आणि त्या कऱ्हाडच्या असल्यामुळे त्यांना नेहमी माझ्याबद्दल एक वेगळाच अभिमान असायचा आणि दरवेळी त्या हे बोलूनही दाखवत. ही साडी म्हणजे जीजींनी मला दिलेला आशीर्वाद आणि त्यांच्या माझ्यावरील अमाप प्रेमाची आठवण समजते. आणि ती मी नक्कीच आयुष्यभर स्वतःकडे जपून ठेवणार आहे. “जीजी, आज तुम्ही इथे माझ्याबरोबर नाही आहात. पण मी नक्कीच सांगू शकते की, तुम्ही जिथे कुठे असेल तिथुन मला पाहत असाल.
आणि या साडीत मला पाहून तुम्हालाही खूप आनंद होत असेल.” मिस यु जीजी. जिजी म्हणजेच कमल ठोके यांनी बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, नामदार मुख्यमंत्री गावडे, सासर माहेर, कुंकू झालं वैरी, भरला मळवट अशा अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अभिनय क्षेत्रात असण्यासोबतच त्या शिक्षिका होत्या. आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. २००५ साली मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली होती. मालिकेतील जिजींच्या भूमिकेमुळे त्यांना याच नावाने ओळखले जायचे. जिजींनी दिलेली ही साडी श्वेतासाठी तितकीच खास ठरली आहे. त्यांच्या आठवणी जाग्या करत त्यांनी दिलेली साडी नेसून तिने त्यांची ईच्छा आज पूर्ण केली आहे.