टाळ मृदंगांचा गजर करत, मुखी विठूनामाचा जयघोष अन् हातात भगवा ध्वज घेऊन असंख्य वारकरी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूर मार्गे रवाना झाली आहेत. वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक संस्था मदतीला धावून येत असतात. हाच मदतीचा हात घेऊन मराठमोळी अभिनेत्री वारकऱ्यांची मनोभावे सेवा करताना पाहायला मिळाली. गेल्या कित्येक वर्षांपासून ही अभिनेत्री वारकऱ्यांना जेवण, औषधं देऊन त्यांचे आशीर्वाद मिळवत आहे. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजसेवा करण्यासाठीच जन्म मिळाला असे मानणारी ही अभिनेत्री आहे कश्मिरा कुलकर्णी. सोशल मीडियावर कश्मिराच्या सामाजिक योगदानाचे कौतुक होताना दिसत आहे.
लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवलेल्या कश्मिराने सामाजिक कार्य करून समाधानी आयुष्याचे खरे गमक शोधून काढले. तिच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. कश्मिरा कुलकर्णी ही मूळची सांगलीची सध्या ती पुण्यात वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच तिने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. कश्मिरा अवघ्या ४ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे घर चालवण्यासाठी आईने सोनाराच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. गरिबीचे चटके सोसत असतानाच वयाच्या १३ व्या वर्षीच तिने आपल्या आईला देखील गमावले होते. आईचे एक स्वप्न होते की आपल्या लेकीने अभिनय क्षेत्रात नाव कमवावे. त्यामुळे लहापणापासूनच कश्मिरा नाटकातून काम करत असे.
पुढे चार दिवस सासूचे मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ढोलकी, श्री गुरुदेवदत्त, कॅरी ऑन मराठा, जर्नी प्रेमाची, मध्यम वर्ग, डबा ऐसपैस अशा मराठी चित्रपट, मालिकेत काम करत असतानाच कश्मिरा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील झळकली. परंतु हे क्षेत्र आपल्याला आयुष्यभर साथ देणारे नाही याची जाणीव तिला झाली होती. लहानपणापासूनच स्वतः कमवायचं त्यामुळे एकाच गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही या मतावर ती पुढे चालत राहिली. अभिनेत्रीचा प्रवास आयुष्यभर पुरेल याची शाश्वती देता येत नाही. उत्पन्नाचे साधन सुरू रहावे म्हणून पेंटिंगच्या ऑर्डर घेणे, वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र विद्या अवगत करून पत्रिका बघणे, इंटेरिअर डिझायनर असे वेगवेगळे कौशल्य तिने अंगिकारले.
कश्मिराची मावशी केटरिंगचा व्यवसाय करत होती तिच्या हाताखाली ती उत्तम स्वयंपाक करायला शिकली. सुकन्या महिला गृहउद्योग या नावाने तिने दिवाळी फराळ, मसालेचा उद्योग सुरू केला. २०१८ साली तिने शुचिकृत्य फाउंडेशनची स्थापना केली. गरजू लोकांना अन्नधान्य, कपडे, मोफत जेवण देते. दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जेवण, पाणी, औषधं, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देते. ‘पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे. महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय. इथे माणसांमधला देव पाहता येतो माणुसकी, सेवाभाव, भक्ती आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो’ असे ती आवर्जून सांगते.