कलर्स मराठी वाहिनीवर योग योगेश्वर जयशंकर ही अध्यात्मिक मालिका प्रसारित होत आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. परमपूज्य शंकर महाराज यांच्या बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत बालपणीच्या शंकर महाराजांची भूमिका आरुष बेडेकर या बालकलाकाराने साकारली आहे. तर उमा ऋषिकेश या मालिकेत शंकर महाराजांची आई पार्वती बाईंची भूमिका साकारत आहे. तर शंकर महाराजांच्या वडिलांची चिमणाजींची भूमिका अभिनेता अतुल आगलावे साकारत आहे.
मालिकेत पार्वती आणि चिमणाजींनी गावाची सत्ता आपल्याकडून हिसकावून घेतल्याचा समज असलेले मार्तंडराव आणि वंदना त्यांच्या वाईटावर टपून आहेत. अशातच मुलाच्या पायात व्यंग असल्याचे त्यांना आढळते. त्यामुळे वंदना आणि मार्तंडराव खुश होऊन गावभर लाडू वाटताना दिसले. वंदना आणि मार्तंड रावांची ही विरोधी भूमिका साकारली आहे अक्षता कुलकर्णी गायकवाड आणि निलेश सूर्यवंशी यांनी. अक्षता कुलकर्णी गायकवाड हिला तुम्ही अनेक मालिकेतून पाहिले असेल. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
अभिनेत्री अक्षता कुलकर्णी गायकवाड हिने अनेक नाटक, मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तिने बक्षीस मिळवली आहेत.
अशातच हिंदी मालिका मेरे साईं मधून ती महत्वाची भूमिका साकारताना दिसली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अक्षता पुन्हा एकदा मराठी मालिकेतून सक्रिय झालेली पाहायला मिळाली. योग योगेश्वर जयशंकर मालिकेत अक्षता वंदनाची भूमिका साकारत आहे ही भूमिका विरोधी ढंगाची असल्याने प्रेक्षकांच्या रोषाला तिला सामोरे जावे लागत आहे. २०१३ साली अक्षताने लोकप्रिय अभिनेता विक्रम गायकवाड सोबत लग्न केले. विक्रम गायकवाड याने मराठी मालिका तसेच चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उंच माझा झोका मालिकेने विक्रमला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चित्रपटांतून तो नेताजी पालकर तर कधी चिमणाजी देशपांडे यांची भूमिका साकारताना दिसला.
स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत विक्रमने शहाजीराजेंची भूमिका साकारली होती. बंदिशाळा, लपाछपी, तुकाराम, डॉ प्रकाश बाबा आमटे, ४ इडियट्स अशा चित्रपटात त्याने विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. लग्नानंतर अक्षता फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाली नाही. मुलगी तावीच्या जन्मानंतर तिच्या पालनपोषणाची तिने जबाबदारी पार पाडली. मेरे साई या मालिकेत अक्षता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. या मालिकेनंतर ती बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मराठी मालिकेत झळकत आहे. त्यामुळे वंदनाची भूमिका अक्षतासाठी तितकीच महत्त्वाची आहे. या भूमिकेसाठी अक्षता कुलकर्णी गायकवाड हिला मनःपूर्वक शुभेच्छा.