दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्या चाहत्याने त्यांना टॅग करून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यात त्या चाहत्याने दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळाले. मात्र हे कौतुक होत असताना डॉ अमोल कोल्हे यांचे आडनाव घेऊन त्यांच्यावर एक आक्षेप घेत म्हटले की ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकर यांचा जबरदस्त अभिनय असलेला चित्रपट.’ हा मजकूर लिहिलेली पोस्ट डॉ अमोल कोल्हे यांनी स्क्रीनशॉट सह शेअर केली.
हे असे आक्षेप वारंवार होऊ लागल्याने त्यांनी यावर स्पष्टीकरण देत एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी आपली बाजू मांडत म्हटले की, ‘आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले. असे असताना अशा प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!’ असे म्हणत नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली. डॉ अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी जाहीर करताच दिग्पाल लांजेकर यांनी त्यांची माफी मागत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
माझ्या एका चाहत्याने लिहिलेली पोस्ट अनावधानाने शेअर करण्यात आली जी मी काही वेळापूर्वीच डिलीट केली आहे. शेर शिवराज चित्रपट निमित्त चाहत्यांनी भरभरून पोस्ट लिहिल्या होत्या. त्यात ही एक पोस्ट होती त्यातील पहिल्या काही ओळी वाचून अनावधानाने ती शेअर करण्यात आली. परंतु लगेच या पोस्टमध्ये अशा प्रकारचं काहीतरी लिहिण्यात आलं आहे तेव्हा ती पोस्ट काही मिनिटातच डिलीट करण्यात आली. दुर्दैवाने या पोस्टचा स्क्रीनशॉट कोणी काढला असेल. पण मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छीतो की, छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठया कलाकाराच्याबद्दल माझ्या मनात कधीही आकस नाही आणि कधी नसेल.’ असे म्हणत दिग्पाल लांजेकर यांनी डॉ अमोल कोल्हे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.