लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेतील बहुतेक सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. यातील समाधान मामा हे पात्र ‘पुष्पे जरा गप्प बसतीस का?’ या एका डायलॉगमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. हे पात्र साकारले होते अभिनेते संतोष पाटील यांनी. या मालिकेनंतर संतोष पाटील यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. याचाच फायदा त्यांना साता जल्माच्या गाठी, सहकुटुंब सहपरिवार, मुलगी झाली हो या मालिकेत काम करताना झाला. संतोष पाटील हे मूळचे साताऱ्याचे. शिवाजी कॉलेजमध्ये असताना त्यांनी एकांकिका, लघुनाटीका, मुखनाट्य, पथनाट्यातून अभिनय साकारला होता. इथूनच प्रायोगिक तसेच हौशी नाटकातून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
सातारचा सलमान या चित्रपटातून त्यांना मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. या यशस्वी प्रवासात सुखवस्तूंची गरज भासू लागली म्हणून त्यांनी पहिली कार खरेदी केली. मात्र आपल्यापेक्षा वडिलांना ही कार खरेदीचा आनंद जास्त आहे हे त्यांना कळून चुकले. संतोष पाटील यांनी यासंदर्भात एक भावुक करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात की, ‘बापा, आपण घेतलेली गाडी तुम्हाला आवडली. तुम्हाला खूप कौतुक वाटलं, आनंदाने सुनबाई ला ड्रायव्हिंग क्लासला जा आणि गाडी चालवायला शिक, अस म्हणालात. स्वतःच्या नातीला सारख गाडीचं नाव विचारत तिची गम्मत करत राहिलात. गाडी आणायच्या दिवशी भांबावल्या सारखे वाट बघत होतात.
गाडीची पूजा केलीत, पेढे वाटले. मी विचारलं बापा तुम्हाला काय हवं? तर मला गाडी सोबत एकट्याला फोटो काढायचा आहे म्हणाले. एवढी छोटी आणि माफक अपेक्षा खर तर मीच हे ओळखायला हवं होतं. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणारे आई आणि वडील. तुम्ही ईश्वरी संकेत आहात, तुम्हाला किती माफक अपेक्षा असतात. आपल्या अपत्यांकडून एक फोटो बस इतकंच. अशावेळी वाटत नुसताच गाडी घेण्याचं नाही तर सतत सावली सारखं वागवणाऱ्या मोबाईलच सुद्दा सार्थक झालं. कुटुंबाच्या आनंदातच आपला आनंद शोधणारे मायबाप प्रत्येक उंबरठ्यावर दिसतात. फक्त ते डोळे, त्याच उंबऱ्याच्या आत असताना आपल्या डोळ्यांना दिसायला पाहिजेत’.