भारतीय क्रिकेट खेळाडू आणि उपकर्णधार कन्नूर लोकेश राहुल याने नुकत्याच केलेल्या एका कामामुळे त्याची पाठ थोपटली जात आहे. एका ११ वर्षीय वरद नलावडे या चिमुकल्याला बोन मॅरोचे निदान झाले होते. शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी ३५ लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले होते. वरदचे वडील सचिन नलावडे हे इन्शुरन्स एजंट आहेत तर त्याची आई स्वप्ना या गृहिणी आहेत. वरदच्या उपचारासाठी होता नव्हता तेवढा जवळचा पैसा संपला मात्र त्यांनी हताश न होता लोकांकडून मदत मागण्याचे ठरवले. वरद हा पाचव्या इयत्तेत शिकत होता सप्टेंबर महिन्यात मुंबईतील जसलोक इस्पितळात त्याला दाखल केले होते. त्याला अप्लास्टिक ऍनिमिया हा दुर्धर आजार झाला असल्याचे निदान झाले होते.
यासाठी ३५ लाखांचा खर्च येईल असे सांगण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून ते या शस्त्रक्रियेसाठी निधी जमा करत होते. ही बातमी के एल राहुल याच्यापर्यत पोहोचली आणि त्याने गिव्ह इंडिया या एनजीओशी संपर्क साधला जेणेकरून वरदला त्याच्या उपचारासाठी हवी ती मदत करता येईल. त्यानंतर राहुलने ३१ लाखांचा मदतनिधी वरदच्या उपचारासाठी पाठवून दिला. माझ्याकडून जेवढ्या जणांना मदत करता येईल तेवढी मी मदत करत राहणार आहे असे तो म्हणतो. वरदवर नुकतीच बोन मॅरो ट्रान्सप्लांटची शस्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. के एल राहुलच्या या मदतीमुळेच माझा मुलगा आज सुखरूप आहे असे मत वरदच्या आईने व्यक्त केले आहे.
आमच्यासाठी इतक्या कमी कालावधीत बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी पैसे मिळवणे कधीच शक्य झाले नसते. मी राहुलचे मनापासून आभार मानते असे त्या म्हणतात. वरदचे वडील सचिन नलावडे यांनी देखील म्हटले की, मी माझ्याजवळ असलेले सर्व पैसे वरदच्या उपचारासाठी लावले होते. त्याचा ११ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता त्यावेळी मी त्याला क्रिकेटची बॅट गिफ्ट केली होती. वरदला मोठा होऊन क्रिकेटर बनण्याची ईच्छा आहे. राहुलच्या मदतनिधीमुळे वरदवर लवकर उपचार होणे शक्य झाले आहे. याच कारणास्तव सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. वेस्टइंडिज सोबतच्या दुसऱ्या सामन्यात राहुलला दुखापत झाली होती. त्यामुळे तो श्रीलंकेसोबत होणाऱ्या टी २० आणि टेस्ट सिरीजमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले जाते.