हिंदी चित्रपट सृष्टीत मुख्य नायिका बनण्याचा मान आजवर अनेक मराठी अभिनेत्रींना मिळाला आहे. अशातच नटखट अदांची सोनाली बेंद्रे हिचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. आग, सरफरोश, हम साथ साथ है, जख्म, मेजर साब, दिलजले अशा चित्रपटातून सोनाली मुख्य भूमिकेत चमकली. अनाहत या मराठी चित्रपटात सोनालीने महत्वपूर्ण भूमिका निभावली. अगं बाई अरेच्चा! या मराठी चित्रपटातील चम चम करता है या आयटम सॉंग मध्ये सोनाली झळकली होती. मराठी हिंदी चित्रपटासोबतच सोनाली छोटया पडद्यावर देखील झळकली आहे. टेलिव्हिजन वरील क्या मस्ती क्या धूम या शोचे सोनालिने सूत्रसंचालन केले होते.
इंडियाज गॉट टॅलेंट, इंडियन आयडल, हिंदुस्तान के हुनरबाज अशा वेगवेगळ्या शो मधून सोनाली परीक्षिकेची भूमिका बजावताना दिसली होती. तर अजीब दास्तान है ये या हिंदी मालिकेतून सोनालीने अभिनय केला होता. या मालिकेतून तिने शोभा सचदेव ही भूमिका साकारली होती. ४ जुलै २०१८ रोजी आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे सोनालीने ट्विट केले होते. तिच्या या खुलाशाने सिनेसृष्टीतील कलाकारांना आणि चाहत्यांना धक्का बसला होता. कॅन्सरचे निदान होताच सोनाली ने इंडियाज बेस्ट ड्रामेबाज हा शो अर्धवट सोडला होता. न्यूयॉर्क मध्ये जाऊन कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर आता सोनाली पुन्हा एकदा कलासृष्टीत येण्यास सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.
तब्बल चार वर्षांनंतर सोनाली बेंद्रे डीआयडी लिटिल मास्टर्सच्या ५ व्या सिझनमध्ये परीक्षिकेची भूमिका बजावताना दिसणार आहे. येत्या १२ मार्च २०२२ पासून झी वाहिनीवर सुरू होत असलेल्या डीआयडी लिटिल मास्टर्स हा डान्स शो सुरू होत आहे. त्यामुळे टेलिव्हिजन वरील या शोची उत्सुकता सोनाली सह तमाम चाहत्यांना लागून राहिली आहे. गेल्या वर्षी सुपर डान्सर या रिऍलिटी शोमध्ये सोनाली पाहुणी कलाकार म्हणून मंचावर दाखल झाली होती. त्यानंतर आता सोनाली पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पणास सज्ज होत आहे. सोनालीला निरोगी आयुष्यासाठी आणि कलासृष्टीतील पुनरागमनासाठी खूप खूप शुभेच्छा.