मोठेपणी प्रत्येकजण कितीही गुड बॉय असला तरी शाळेत प्रत्येकाने काहीना काहीतरी उद्योग करून शिक्षकांचा तर मार खाल्लेला असतोच. शिवाय शाळेतील पराक्रमाची तक्रार घरी कळल्यावर आई वडिलांकडून देखील प्रसाद मिळालेला असतो. यामध्ये सेलिब्रिटी कलाकारही मागे राहतील कसे. छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर चॉकलेट बॉय बनून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, हा पडद्यावर जरी गुडबाय दिसत असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूपच वात्रट आहे. शाळेत असताना मुले फार तर वर्गातल्या मुलांची टर उडवतात किंवा एकमेकांच्या खोड्या काढतात.

सिद्धार्थ चांदेकर हा पुण्याच्या प्रभुकृपा बालक मंदिरमध्ये शिकायला होता. तेव्हाची आठवण सिद्धार्थने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केली आहे. मुलं, शाळा आणि त्यांच्या शालेय जीवनातील करामती या अनुषंगाने सुरू असलेल्या गप्पांच्या ओघात सिद्धार्थ त्याच्या शाळेत पोहोचला आणि त्याने हा किस्सा सांगितला. शाळेमध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डवर खूप बटण असतात, त्याचे सिद्धार्थला नेहमीच औत्सुक्य वाटायचं. कुठलं बटन दाबल्यानंतर शाळेतल्या कुठल्या वर्गातली ट्यूब लागत असेल याचं त्याला फार आकर्षण असायचं. त्याच उत्सुकतेपोटी एकदा तो त्या स्विच बोर्ड जवळ जाऊन बटन चालू बंद करत होता. त्यावेळेस त्याला असे दिसले की एक वायर थोडीशी खाली आलेली आहे. आणि ती जेव्हा त्याने बाहेर ओढली तेव्हा त्यातून एक लखलखीत ठिणगी बाहेर आली.

शालेय वयामध्ये ही गोष्ट सिद्धार्थला खूप मजेशीर वाटली. मग त्याने सगळ्या मित्रांना गोळा करून पुन्हा ही मजा करून दाखवली. त्यानंतर मात्र त्याच्या मित्रांनादेखील सिद्धार्थच्या या करामतीचा कौतुक वाटायला लागलं. सिद्धार्थ कसली भारी ठिणगी काढून दाखवतो अशी चर्चा इतकी वाढली कि त्याची कॉलर यानिमित्ताने ताठ झाली. एके दिवशी हे दाखवत असताना वायर इतकी जोरात ओरडली की अख्खी वायरच त्याच्या हातात आली. आणि त्याचा पुढचा परिणाम व्हायचा तोच झाला. फ्यूज उडाल्याने संपूर्ण शाळा अंधारात गेली. कुठल्याच वर्गातले दिवे, फॅन लागेनात. मग सिद्धार्थची वरात थेट मुख्याध्यापकांच्या केबिनपर्यंत पोहोचली. सिद्धार्थ सांगतो, सगळी लाईट तेव्हा मी पण घाबरलो.

शिक्षकांना कळलं तेव्हा त्यांनी तर मला मारलंच पण मुख्याध्यापकांनी पट्टीने माझ्या हाताची सालटं सोलून काढली.घरीदेखील तक्रार गेल्यामुळे आई बाबांकडून मिळालेला मार वेगळाच होता. त्यानंतर मी मात्र असा कधीच उपद्व्याप केला नाही. आता जेव्हा मला असं विचारतात की तू असं का केलं होतस, तर त्यावर फक्त आणि फक्त मजा वाटली तेवढेच उत्तर मला सांगता येतं. ही आठवण जेव्हा सिद्धार्थने शेअर केली तेव्हा तो हे सांगायला विसरला नाही की, त्यानंतर शाळेत असं काहीही झालं तरी सगळेजण माझ्याकडे बोट दाखवायचे. त्यामुळे पास होऊन शाळेबाहेर पडेपर्यंत मला कानफाट्या हेच नाव पडलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा किस्सा शेअर करत असताना बायको मिताली त्याच्या शेजारी बसली होती.
मितालीला आजपर्यंत त्याचा हा उद्योग माहीत नसल्याने तिच्या चेहर्यावरचे हावभाव पाहणं ही त्या दोघांच्या चाहत्यांसाठी एक वेगळी ट्रीट होती. सिद्धार्थ चांदेकर नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. सांग तू आहेस का या मालिकेत स्वराज ही भूमिका त्याने वठवली होती. ज्यामध्ये तो सेलिब्रिटी अभिनेताच साकार करत होता. सिद्धार्थचा झिम्मा हा सिनेमादेखील मोठ्या पडद्यावर हिट झाला आहे. गेल्यावर्षीच त्याचे आणि मिताली मयेकरचे पुण्यातील ढेपेवाडा येथे शाही लग्न झाले. सिध्दार्थ सतत नवनवे किस्से सांगून चाहत्यांशी कनेक्ट राहत असतो. यानिमित्ताने सिद्धार्थने त्याच्या शालेय जीवनातील शेअर केलेला हा किस्सा त्याच्या चाहत्यांना भलताच आवडत आहे.