Breaking News
Home / जरा हटके / अखेरचा हा तुला दंडवत.. गानसम्राज्ञी लता मंगेशकर कालवश
singer lata manageshkar
singer lata manageshkar

अखेरचा हा तुला दंडवत.. गानसम्राज्ञी लता मंगेशकर कालवश

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी लता दीदींनी आज जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागच्या महिन्यात ८ जानेवारीपासूनच ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. लता मंगेशकर यांच्यावर बऱ्याच काळापासून उपचार सुरू होते. दरम्यान मधल्या काळात त्यांच्या निधनाच्या अफवेमुळे गोंधळ उडाला होता त्या अफवांचे खंडन त्यांनी स्वता सोशल मीडियावर व्यक्त केले होते. मात्र शनिवारी दुपारपासूनच लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले जात होते.

singer lata manageshkar
singer lata manageshkar

यावर ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या आवारातच पत्रकार परिषद भरवली आणि लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचाराला प्रतिसाद देत आहेत असे म्हटले होते. प्रकृती खालावल्याने आणि श्वास घेता येत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर पूर्णपणे लक्ष्य ठेवून आहे असाही दिलासा त्यांनी यावेळी दिलेला पाहायला मिळाला. शनिवारी दुपारपासूनच लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असल्याचे समजताच राज ठाकरे, रश्मी ठाकरे या लता मंगेशकर यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील लता दीदींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या.

lata mangeshkar aasha bhosale
lata mangeshkar aasha bhosale

आशा भोसले, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मधुर भांडारकर यांनी देखील हॉस्पिटलमध्ये धाव घेतलेली पाहायला मिळाली. गानसम्राज्ञी, गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर मध्यप्रदेशात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलाकार होते. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षीच लता मंगेशकर यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. मास्टर विनायक यांनी मंगेशकर कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. १९४२ साली पहिली मंगळागौर ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका त्यांनी लता दिदींना देऊ केली. ह्या चित्रपटात लता दीदींनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले होते.

great singer lata didi
great singer lata didi

१९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लतादीदी मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. १९४६ साली त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले होते. आपल्या कारकिर्दीत जवळपास पंचवीस ते तीस हजार गीते त्यांनी गायली आहेत. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख केला जातो. लता मंगेशकर यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.