संदीप खरे आणि दीप्ती भागवत यांची प्रमुख भूमिका असलेला दमलेल्या बाबाची कहाणी हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बाप लेकीच्या नात्यावर विशेष भाष्य करणारा होता. चित्रपटात एक बालकलाकार झळकली होती तिचे नाव आहे श्रेया पासलकर. श्रेया पासलकर ही चिमुरडी आता मालिका आणि हिंदी तसेच मराठी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. श्रेया पासलकर ही पुण्यातच लहानाची मोठी झाली. तिची आई पल्लवी पासलकर राजकारणाशी निगडित आहे. तर वडील शिवा पासलकर हे मोठे व्यावसायिक आहेत.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या श्रेयाने दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटातून बालकलाकाराची भूमिका साकारली. या चित्रपटामुळे श्रेयाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. तसेच चिक्की या शॉर्ट फिल्ममध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली होती. या शॉर्टफिल्ममधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. नटसम्राट हे गाजलेलं नाटक तसेच पांडुरंगाची कृपा या अल्बममध्ये ती बाल भूमिकेत दिसली होती. अभिनयासोबतच श्रेयाला गाण्याची देखील आवड आहे. वाघेऱ्या, गेट टूगेदर, खिचिक, ऍटमगिरी, बाबो अशा मराठी चित्रपटासोबतच श्रेयाने भंवर या हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. खुर्ची या आगामी मराठी चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात डॅडींचा जावई म्हणजेच अभिनेता अक्षय वाघमारे महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे काम खूप अगोदरच पूर्ण झाले असून तो प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला पाहायला मिळतो आहे. सध्या कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या लोकप्रिय मालिकेत सुहानीची शोधाशोध सुरू आहे. या मालिकेत श्रेया पासलकर ही श्वेताच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सुहानीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती झळकताना दिसत आहे. एक बालकलाकार ते मराठी चित्रपटांची मुख्य नायिका असा तिचा हा अभिनय क्षेत्रातला प्रवास खूपच उल्लेखनीय ठरला आहे. आई मायेचं कवच या मालिकेतून ती सहाय्यक भूमिका साकारत आहे. खुर्ची या आगामी चित्रपटानिमित्त श्रेयाचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा.