सिनेसृष्टीतील कलाकार आठवण म्हणून आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अभिनेत्री मुक्ता बर्वेने देखील तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर करून भावला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देबु बर्वे असे मुक्ताच्या मोठ्या भावाचे नाव आहे. देबु बर्वे हा आर्टिस्ट असून त्याला पेंटिंगची आवड आहे. लहानपणीची बहीण भावातील गंमत सांगताना देबुने एक किस्सा सांगितला, मी मोठा असल्याने मुक्ताने माझं सर्व काही ऐकावं असं वाटायचं. एकदा तिला शाळेत सोडायला जात असताना मुक्ताच्या पायातली चप्पल ओढ्यात पडली. पण चप्पल ओढ्यात वाहून गेली नाही असं त्याने तिला सर्वांना सांगायला लावलं होतं. त्यामुळे पायात एकच चप्पल पाहून शाळेतील शिपायाने त्याबाबत चौकशी केली.

पण मुक्ताने काहीच सांगितले नाही, शेवटी शिपायाने घरी फोन लावला. भावाचा आदेश मुक्ताने मात्र इथे अगदी तंतोतंत पाळला होता. मोठे झाल्यावरही ह्या गमतीजमती आमच्यात चालू असतात. या गोष्टी माझ्या पत्नीला आणि आईला कळल्या त्यावेळी ते आमच्या वागण्यावर फक्त हसतात. मात्र या गोष्टींमुळे आमच्या वागण्यात काहीच फरक झाला नाही आणि तिलाही त्याबाबत कधी वाईट वाटलं नाही. १७ मे १९७९ साली मुक्ताचा बर्वे कुटुंबात जन्म झाला. पुण्यातील चिंचवड परिसरात तिचे बालपण गेले. मुक्ताची आई या शिक्षिका आणि नाट्य लेखिका होत. लहानपणापासूनच मुक्ता नाटकांतून काम करत असे. आईच्याच रुसू नका फुगू नका या नाटकात मुक्ताने काम केले होते, अभिनयाची गोडी इथूनच निर्माण झाली. पुढे ललित कला केंद्र मधून तिने अभिनयाचे धडे गिरवले. वयाच्या १५ व्या वर्षी एका नाट्यस्पर्धेत तिने रत्नाकर मतकरी यांच्या घर तिघांचे हवे या नाटकात काम केले होते.

त्यानंतर आम्हाला वेगळं व्हायचंय या नाटकातून तिने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. घडलंय बिघडलंय या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. जोगवा, बंधन, आम्ही दोघी, एका लग्नाची दुसरी गोष्ट, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे अशा लोकप्रिय मालिका. तर चकवा, लग्न पाहावे करून, मुंबई पुणे मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, बंदिशाळा अशा चित्रपटातून तिला अभिनयाची संधी मिळत गेली. मराठी सृष्टीतील एक अभ्यासू तसेच स्वतंत्र विचारांची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. त्याचमुळे वयाची चाळीशी ओलांडली तरी अजूनही तिने लग्न न करण्याचा विचार घेतला हे विशेष. अजूनही बरसात आहे या मालिकेतून उमेश कामत आणि मुक्ता बर्वे कित्येक वर्षानंतर एकत्रित काम करत आहेत. या मालिकेतून दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे. मुक्ताने साकारलेली मीराची भूमिका तितकीच सशक्त वाटते.
