मराठी, हिंदी नाट्य अभिनेता सौरभ ठाकरे आणि अभिनेत्री दिग्दर्शिका किरण पावसकर यांचा दोन दिवसांपूर्वीच साखरपुडा संपन्न झाला आहे. सौरभ ठाकरे याने स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मोगरा फुलला या चित्रपटात काम केले आहे. हारूस मारुस, युगपुरुष, छोटा भीम, उमराव जान अशा विविध नाटकांमधून त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर युगपुरुष हे नाटक प्रक्षेपित करण्यात आले होते. या नाटकातून सौरभने महात्मा गांधींची भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवली होती.
‘परदे के पिछे’ या मोबाईल शॉर्टफिल्ममध्ये सौरभ ठाकरे आणि पृथ्वीश मेहता झळकले होते. ह्या शॉर्टफिल्मने बेस्ट फिल्मचा अवॉर्ड आणि बेस्ट ऍक्टर्सचे अवॉर्ड मिळवले होते. सौरभ आणि पृथ्वीश या दोघांनाही हे पुरस्कार मिळाले होते. इंटरनेटच्या माध्यमातून रेडिओ कार्यक्रम आयोजित केले जातात. पॉडकस्ट किंवा पॉडकास्टिंग म्हणजे इंटरनेटवर चालणारा रेडिओ शो असतो. यालाच इंटरनेटचा रेडिओ असेही म्हटले जाते. यामध्यातून आपल्याला हवे असलेले कोणतेही पॉडकास्ट आपण ऐकू शकतो. कार्यक्रमांची एक मालिका असते ज्यात एखाद्या विषयावर बोलले जाते, त्यावर चर्चा केली जाते किंवा एखाद्या विषयाचे ज्ञान सामायिक केले जाते. अशाच पॉडकास्टिंगच्या माध्यमातून सौरभ ठाकरे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे. सारेगम कारवांसाठी सौरभ ने किस्से और कहानियां या सेगमेंटमध्ये हिंदी माध्यमातून किस्से सांगितले आहेत.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाचा प्रवास त्याने आपल्या शैलीतून सादर केला होता. सौरभ ठाकरे आणि किरण पावसकर हे दोघेही कलाकार गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतात. किरण पावसकर ही देखील नाट्य अभिनेत्री तसेच दिग्दर्शिका आहे. सीता, काय रे गोट्या, अंधायुग, उरुभंगम या नाटकांमधून तिने अभिनय साकारला असून काही नाटकांचे दिग्दर्शन देखील केलं आहे. किरण पावसकर हीने डी जी रुपारेल कॉलेज मधून शिक्षण घेतले असून मुंबई युनिव्हर्सिटमधून अकॅडमी ऑफ थेटर आर्टस् केलं आहे. किरदार आर्ट फाऊंडेशन या संस्थेशी ती जोडली गेली आहे. किरण पावसकर आणि सौरभ ठाकरे यांनी नाटकांमधून एकत्रित काम केलं आहे. यातूनच त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे आता लवकरच लग्नात रूपांतर होणार आहे. साखरपुड्यानिमित्त किरण पावसकर आणि सौरभ ठाकरे यांचे अभिनंदन!