समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे काल ४ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये काल ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून माईंना चालताना त्रास जाणवत होता त्यामुळे त्या एकाच जागेवर बसून असायच्या. पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना देखील त्या व्हीलचेअरवरूनच मंचावर दाखल झाल्या होत्या. त्यात काही दिवसांपूर्वीच त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले होते. माईंचा जीवनप्रवास खूपच खडतर होता या खडतर प्रवासात त्या अनेक अनाथांची माय बनल्या होत्या.
अनेक सामाजिक संस्था त्यांनी उभ्या केल्या होत्या त्यातून हजारो मुलांना त्यांनी आपल्या मायेचा पदर पांघरला होता. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी महाराष्ट्र पोरका झाला असल्याची खंत व्यक्त केली आहे. तर वेगवेगळ्या स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. आज सकाळी पुण्यातील मांजरी येथील सन्मती बालनिकेतन आश्रमात त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले होते. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला नाही, महानुभाव पंथाप्रमाणे त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. पुण्यातील ठोसरपागा या दफन भूमीत शासकीय इतमामात त्यांना निरोप देण्यात आला यावेळी खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी एकवटला होता. त्यामुळे स्मशान शांतता या ठिकाणी पाहायला मिळाली होती. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचया पार्थिवाला दफन करण्यात आले याला एक कारण देखील होते.
सिंधुताई सपकाळ यांनी एका कवितेत म्हटले होते की, “मला जाळू नका.. मातीत गाडून टाका”.. खरंच, मी जेव्हा जमीनदोस्त होईन सोबत काय येईल, मागे काय राहील?.. दुर्दैवाचे खडक फोडले, दुःख वाहिलं मूर्तिमंत उभं आयुष्य गेलं, ना खेद ना खंत ह्यातून नवी पहाट, उद्याचं स्वप्न पाहिलं.. अनेकांना जवळ केलं, देता आलं तेवढं दिलं आता थकलेत रस्ते, मनही खुणावते धीरे आस्ते संपेल आयुष्याचं तेल, पणती विझून जाईल.. सातपुडा उरी फुटेल चिखलदऱ्याचा धीर सुटेल वासराच्या गाई हंबरतील पशुपक्षी ‘भैरवी’ गातील स्तब्ध होतील वादळवारे कडे कपारी, आणि झरे दुरावलेल्या भाग्याचं मी ‘अहेव’ लेणं लेईल मातीचा पदर पांघरून मला ‘धरती’ पोटात घेईल.’ पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कवितेतूनच हे स्पष्ट म्हटलं आहे की ‘मला जाळू नका तर मातीत गाडून टाका.’ मातीचा पदर पांघरून धरती मला पोटात घेईल अशी भावना त्यांनी या कवितेतून व्यक्त केली होती.