सांज ये गोकुळी.. हे वजीर चित्रपटातील आशाताईंच्या आवाजातील सुमधुर गाणं. हे गाणं हुबेहूब गाऊन सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मंगलताई जावळे यांची मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी नुकतीच भेट घेतली आहे. मंगलताई जावळे कुठं राहतात याचा शोध घेऊन महेश टिळेकर त्यांच्या घरी जातात. मंगलताई जावळे या एसटी स्टँडवर गाणं गातात आणि त्यातून त्यांना काही पैसे मिळतात. गाणं शिकण्याबाबत मंगलताई सांगतात की, वडील दारू प्यायचे पण त्यांना गाण्याची खूप आवड होती. त्यांनीच आम्हाला कसं गायचं ही कला शिकवली. वयाच्या १० व्या वर्षांपासून मी गाणं गाते, परंतु शिक्षण नसल्याने मला अजिबात लिहिता वाचता येत नाही.
शिरवळला असताना एसटी स्टँडवर राहून गाणं गायचे त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या संसाराचा त्या गाडा चालवत असत. लहानपणापासून गरिबीची झळ सोसलीय ती अगदी लग्नानंतरही. मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. माझ्या नातवाला हाडाचा कॅन्सर झाला यात त्याचं निधनही झालं. एक मुलगा आहे त्याच्या पायात रॉड बसवले आहेत तर त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. त्याचं लग्न झालंय आणि त्याला तीन मुलं आहेत. मी एकटी आई काय करणार? पण यातूनही खचून न जाता मी आजही गाणं गायचं सोडलं नाही आजही मला गाणं गायचे कधी ५० तर कधी २०० रुपये मिळतात. अशा तुटपुंज्या पैशातून घर चालवणं त्यांना कठीण जात आहे. त्यामुळे एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळावं अशी अपेक्षा महेश टिळेकर यांनी व्यक्त केली आहे.
आजकाल फॅशन करून, चांगले कपडे घालून कितीतरी गायक समोर आले आहेत. मात्र अशा साध्या सुध्या मंगलाताई चेहऱ्यावर कसलाही मेकप थापलेला नाही. की कुठलीही प्लॅस्टिक सर्जरी करून आणि फॅशनेबल कपडे घालून उगाच आकर्षक दिसण्याचा फालतू प्रयत्न नाही. एका गरीब घरातील बाईंनी गायलेले हे गाणे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल आणि कानात हा आवाज साठून राहील. मला जे शक्य आहे तशी त्यांची मी मदत करणारच आहे आणि करतो आहे. सध्या महेश टिळेकर यांनी मंगलताईंना पैठणी, देवी सरवस्तीची फ्रेम आणि आर्थिक स्वरूपाची काही मदत देखील केली आहे. मंगल ताईंसाठी तुम्हाला जे जे शक्य होईल तशी तुम्ही त्यांची मदत करू शकता, असे आवाहन महेश टिळेकर यांनी केलं आहे. मंगलताई हिंदी मराठी चित्रपटातील गाणी खूप सुरेख गातात. त्यामुळे हा व्हिडीओ ज्यांनी ज्यांनी पाहिलाय आणि त्यांना मंगलताईंची मदत करावीशी वाटतेय अशांनी मदत करावी असे आवाहन महेश टिळेकर यांनी केलं आहे.