Breaking News
Home / मराठी तडका / ह्या अभिनेत्रीला ओळखलंत का? निवेदिता सराफ यांच्या वडिलांसोबत केले होते काम…
anupama marathi actress
anupama marathi actress

ह्या अभिनेत्रीला ओळखलंत का? निवेदिता सराफ यांच्या वडिलांसोबत केले होते काम…

​७० च्या दशकातली मराठी सृष्टीला लाभलेली एक सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून “अनुपमा” यांच्याकडे पाहिले जाते. सध्या त्या मराठी चित्रपट सृष्टीत सक्रिय नसल्या तरी शिकागो येथे राहून नाटकांच्या माध्यमातून कला सृष्टीशी जोडलेल्या पाहायला मिळतात.​ काही वर्षांपूर्वी तेजश्री प्रधान आ​​णि आस्ताद काळे अभिनित ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकाच्या प्रयोगाला त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी तेजश्री प्रधानसोबत त्यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता​,​ इतक्या वर्षांनी अनुपमा यांना पाहायला मिळाल्याने अनेक प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले.

anupama marathi actress
anupama marathi actress

अनुपमा या पूर्वाश्रमीच्या रेखा कुलकर्णी. २३ एप्रिल १९५० रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अनुपमा हे नाव त्यांना कथा, संवाद आणि नाट्यलेखक मधुसूदन कालेलकर यांनी दिलं होतं. अनुपमा यांचे वडील जयंत कुलकर्णी हे रेल्वेत नोकरीला तर आई अलका कुलकर्णी या एलआयसीमध्ये काम करत होत्या. त्यांचे शालेय शिक्षण माटुंग्याच्या लोकमान्य विद्यामंदिर येथे तर पुढील शिक्षण त्यांनी रुपारेल महाविद्यालयातुन घेतलं. अनुपमा यांनी वयाच्या १७ व्या वर्षी मधुसूदन कालेलकर यांच्या ‘आसावरी ‘ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. याच नाटकातील भूमिकेच्या नावाने पुढे त्यांना ओळख मिळाली. या नाटकामुळे त्यांना चित्रपटात येण्याची संधी मिळाली. भालजी पेंढारकर यांच्याकडून अभिनयाचे बारकावे शिकल्यानंतर १९६८ साली राजदत्त दिग्दर्शित ” घरची राणी” हा पहिला चित्रपट त्यांनी साकारला. या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयामुळे त्यांना ‘धर्मकन्या’ (१९६८) या चित्रपटात भूमिका मिळाली. “गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी” हे धर्मकन्या चित्रपटातलं गीत अनुपमा ह्यांच्यावर चित्रित झालं जे आजही कुठल्या लग्नाच्या व्हिडिओत वाजलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर अनुपमा यांनी ‘एक माती अनेक नाती’ असे एका पाठोपाठ तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित झाले.

beautiful actress anupama
beautiful actress anupama

१९६९ साली आधार हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात अनुपमा यांनी निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांच्यासोबत मुख्य भूमिका निभावली. गजन जोशी यांनी ७० च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्य कांक्षीनि अशा चित्रपटातून अभिनय साकारला होता. आधार या चित्रपटातील ‘माझ्या रे प्रीती फुला…’ हे गीत पुण्याच्या प्रसिद्ध सारसबाग येथे गजन जोशी आणि अनुपमा यांच्यावर चित्रित केलं होतं ही ह्या गाण्याची खास आठवण म्हणावी लागेल. ‘तांबडी माती’ (१९६९), ‘देवमाणूस’ (१९७०), ‘नाते जडले दोन जिवांचे’ (१९७१), ‘पाठराखीण’ (१९७२), ‘राजा शिवछत्रपती’ (१९७४), ‘सापळा’ (१९७६) ‘परिवर्तन’ (१९७९) या चित्रपटांमध्ये अनुपमा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका केलेल्या अनुपमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यावर ‘संसार’, ‘दुनिया क्या जाने’, ‘सांस भी कभी बहू थी’, ‘दो बच्चे दस हाथ’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘पाप और पुण्य’ या चित्रपटांमधून भूमिका केल्या. केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे तर अनुपमा यांनी गुजराती चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. ‘धरती ना लोलू’ या गुजराती चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना गुजरात सरकारने पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला होता. तसेच ‘जेसल तोरल’ (१९७१), ‘जेहर तो विखा जानी’ (१९७७) असे आणखी काही चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवले​​ आहेत.

senior actor anupama dharkar
senior actor anupama dharkar

नाटक, चित्रपट असा प्रवास सुरु असताना बडोद्याच्या डॉ दिलीप धारकर यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला आणि शोकागोला स्थायिक झाल्या. परदेशात राहूनही त्या स्वस्थ बसल्या नाहीत तर तिथल्या कलाकारांना घेऊन त्यांनी ‘माऊली’ सारख्या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. आज इतकी वर्षे उलटूनही धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना…, गोड गोजिरी लाज लाजरी…, माझ्या रे प्रीती फुला… यासारख्या आजही तितक्याच लोकप्रिय असलेल्या गाण्यांमधल्या अनुपमा ह्यांचा अप्रतिम देखणा चेहरा नजरेसमोरून हटत नाही…

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.