एखाद्या कर्मयोग्याच्या पश्चात फक्त त्याच्या आठवणी नाही तर मूल्यही प्रेरणा देतात, म्हणूनच असामान्य जिद्द, कष्टाची सोबत आणि नात्यातला गोडवा देणारी भाऊसाहेब चितळेंची शिकवण त्यांच्या पश्चात कसोशीने जपणारे आदर्शवत चितळे बंधू मिठाईवाले कुटुंब. चितळे बंधू यांच्या दर्जेदार मिठाईचा प्रवास तब्बल चार पिढ्यांनंतरही टिकवून ठेवला आहे. आज मिठाई म्हटले की चितळे बंधू शिवाय दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नाही. अगदी बाकरवडीचे नाव उच्चारले तरी जिभेवर चव यायच्या अगोदर ओठी चितळे बंधूंचे नाव येते, इतकी चितळेंच्या मिठाईचा मिठास प्रसिद्ध आहे.
देशाच्या रक्षणासाठी भौतिक सुखांचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या जवानांना कुटूंबापासून हजारो किलोमीटर दूर राहावे लागते. घरातील लहान मोठ्या सण समारंभांना देखील मुकावे लागते, कित्येक जवानांना त्यांच्या वयस्कर आई वडिलांची अखेरची भेटही सुट्टी अभावी होत नाही. सामाजिकबांधिलकी जपत त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत चितळे बंधू आणि पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील स्नेहसेवा संस्था या बांधवांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न दरवर्षी करीत असतात. संपत्ती आणि यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भल्याभल्यांना संपत्तीच्या धुंदीत कुणाची आठवण येत नाही, परंतु चितळे बंधूंनी हे यश सामाजिक बांधिलकी जोपासत खऱ्या अर्थाने पचवले आहे. त्यामुळे मिठाई इतकाच चितळे बंधूंच्या देशभक्तीचा गोडवाही सुमधुर झाला आहे, गेल्या बत्तीस वर्षांपासून चितळे बंधू सीमेवरच्या जवानांना दिवाळी निमित्त खास मिठाईचे पुडे पाठवण्याचे अविरत काम करीत आहेत. तब्बल १०००० मिठाईचे बाॅक्स दरवर्षी डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत विना मोबदला पाठवण्यात येतात, पण याचा गाजावाजा त्यांनी कधीच केला नाही. विजय, सुरक्षा, समाधान, आनंद, शौर्य देणारी होवो अशा दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा त्यासोबत दिल्या जातात. पुण्यातील स्नेहसेवा संस्थेत काही सेवानिवृत्त भारतीय जवान काम करतात, त्यांच्या मदतीने पुण्यातील मराठा लाईफ इन्फन्टरी मुख्यालयातून ही मिठाई देशाच्या विविध सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवली जाते. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर मिठाई भेटली पाहिजे यासाठी दिवाळीच्या आधीच सगळी यंत्रणा कामाला लागते.
एका मुलाखतीत अंजली चितळे या यशाचे रहस्य खूप समर्पकपणे मांडले होते, “एकत्र कुटुंबाच्या अथक परिश्रमाच्या मागे आम्ही जावा जावा गुण्यागोविंदाने नांदतो म्हणून आमच्याकडे आर्थिक सुबत्ता आली आणि त्यामुळेच हे विश्व निर्माण करणे शक्य झाले.” दुधाच्या व्यवसायात पर्यायाने मिठाई व्यवसायात चितळे बंधू हे नाव खुप मोठे झाले, आज त्यांच्या मिठाईला जगभरातून मागणी मिळत आहे. चितळे बंधूंनी व्यवसायात घेतलेली भरारी प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशीच आहे. चितळे हे त्यांच्या पदार्थां बरोबर प्रबोधनपर हटके जाहिरातींसाठीही सर्वश्रुत आहेत. भास्कर गणेश चितळे यांनी ऐंशी वर्षांपूर्वी सुरु केलेल्या घरगुती दुधाच्या व्यवसायाला सचोटीने आणि तितक्याच प्रामाणिकपणे पुढील पिढीने भल्या मोठ्या आधुनिक यंत्रणेच्या उद्योगात रूपांतरित केले. चितळेंच्या मिठाईला मिठास आहे हे माहित होते पण त्याला देशभक्तीचा सुंगंध असल्याचे ऐकून मनापासून अभिमान वाटतो.