Breaking News
Home / नाटक / महाराष्ट्राच्या संपन्न नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींच्या दैदीप्यमान प्रवासाला मानवंदना
5 november marathi rangbhumi din
5 november marathi rangbhumi din

महाराष्ट्राच्या संपन्न नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींच्या दैदीप्यमान प्रवासाला मानवंदना

संपन्न महाराष्ट्रभूमी नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा असेलला नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. नाटकाची व्याप्ती खूपच व्यापक आहे, संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असे साध्या सोप्या शब्दात मांडता येईल. मराठी नाटकांना संगीत नाटकांची उज्वल परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा अशी नाटके प्रचंड गाजली. नाटके बंद झाली तरी त्यांतील पदे अनेकदा अन्य गायकांकडून आजही गायली जातात. नाट्यछटा, एकांकिका, दीर्घांक, लघुनाटक, नाटिका, नाटक, दीर्घ नाटक, नाट्यत्रयी अशी प्रयोगाच्या लांबी नुसार नाटकाची वर्गवारी करता येईल..

5 november marathi rangbhumi din
5 november marathi rangbhumi din

दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. आद्य संगीत नाटककार विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी एकत्र येऊन आणि सांगली येथे शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी पहिले नाट्य संमेलन आयोजित केले, या संमेलनाचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने एकत्रित ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून जाहीर केला.

नव्वदच्या दशकात नाटकाकडे मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. या काळातील उत्तम नाटकांची नोंद घेण्याइतपत प्रेक्षकांकडून प्रतिसाद देखील मिळत नव्हता. त्यातच नव्याने सुरु झालेल्या टेलिव्हिजन मालिकांच्या करमणुकीशी स्पर्धा करत व्यावसायिकांनी विनोदी नाटकांच्या रूपाने प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला. सर्वसामान्य माणसाच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांनी इतका प्रभाव टाकला होता की मराठी मध्यमवर्गाने टिकवून धरलेली त्याची सांस्कृतिक ओळखही बदलू लागली होती. यात मराठी माणसाच्या करमणुकीच्या यादीतले नाटकाचे अढळ स्थान घसरत खूप खाली गेले. तशात मराठी चित्रपटांनी आश्चर्यकारकरीत्या उचल खाल्ली आणि नाटकांना आणखी एक धक्का बसला. असे होऊन देखील मागील तीन दशकात मराठी नाटकांना पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली. रंगभूमीवर नवनवीन कलाकारांनी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळविला यात प्रामुख्याने ती फुलराणी, लेकुरे उदंड झाली, तो मी नव्हेच, अबीर गुलाल, अ फेअर डील, ऑल दि बेस्ट, इंदिरा, कळत नकळत, बहुरूपी, आम्ही दोघे राजा राणी, मोरूची मावशी, गोष्ट तशी गमतीची, तो मी नव्हेच, जन्मरहस्य, ठष्ट, डोण्ट वरी बी हॅपी, ढोलताशे, खरं सांगायचं तर, मी नथुराम गोडसे बोलतोय, श्यामची मम्मी, नटसम्राट, एक डाव भटाचा, त्या तिघांची गोष्ट, दोन स्पेशल, परफेक्ट मिसमॅच, लगीनघाई, वाडा चिरेबंदी, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, शेवग्याच्या शेंगा, श्री बाई समर्थ, सही रे सही, स्पिरीट, सुस्साट, सेल्फी अशा अनेक नाटकांची वर्णी लागली.

bharat jadhav nirmiti sawant subodh bhave prashant damle
bharat jadhav nirmiti sawant subodh bhave prashant damle

मराठी रंगभूमी दिनी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती १९६० सालापासून विष्णुदास भावे यांच्या स्मृत्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ देऊन त्यांचा सन्मान करते. गौरव पदक, रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. रंगभूमीवर विनोदी, सामाजिक, ऐतिहासिक, रहस्यमय, तसेच मनोरंजनपर विविध स्वरूपाचे विषय हाताळले जाऊ लागल्याने नामांकित कंपनी आणि कलाकारांच्या अपार मेहनतीने ही मराठी नाट्यसृष्टी खऱ्या अर्थाने जिवंत ठेवली आहे. तब्बल १७८ वर्षांची ही मराठी नाटकांची परंपरा येत्या काळात आणखीन वृद्धिंगत होत राहो ही सदिच्छा आणि सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.