संदीप खरे हे प्रसिद्ध मराठी कवी व गायक. त्यांचे ‘दिवस असे की’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही’ हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. आयुष्यावर बोलू काही, कधीतरी वेड्यागत आणि इर्शाद हे कार्यक्रम त्यांनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. इर्शाद या कार्यक्रमाचे त्यांनी नाव बदलावे अशी अनेकदा मागणी करण्यात आली होती मात्र यावर पूर्ण विचार करून त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
याबाबत स्पष्टीकरण देत संदीप खरे आणि वैभव जोशी म्हणतात की.. काव्य रसिकहो, सप्रेम नमस्कार! ‘इर्शाद’ हा कार्यक्रम गेले सुमारे ५ वर्षांपासून, रसिकांच्या भरभरून प्रतिसादासह सादर होतो आहे. भारतात आणि भारताबाहेरही याचे प्रयोग संपन्न झाले आहेत. कुठल्याही निमित्ताने नव्हे तर प्रामुख्याने मराठी कवितांसोबतच हिंदी, उर्दू कविताही यात सादर होत असल्याने, काव्यमैफिलीला समर्पक अशा ‘इर्शाद’ या शीर्षकानेच भविष्यातही हा कार्यक्रम करावयाची इच्छा आहे! कुठल्याही दिवशी वा प्रसंगी ही मैफिल आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी व प्रायोजकांनी याची दखल घ्यावी, ही नम्र विनंती! ५ नोव्हेंबर २०२१ च्या कार्यक्रमाविषयी सांगायचे तर विचारांती नाव न बदलण्याचे ठरल्यावर हा कार्यक्रम आणि त्या नुसार साहजिकच पुढील जाहिरात रद्द करावी असे ठरले व त्या प्रमाणे वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी जाहिरात आली नाही!
बदललेल्या नावासह सोशल मीडिया वर प्रसिध्द झालेली जाहिरात ही मुळात कशी आली व कुणी केली हा आम्हालाही पडलेला प्रश्न आहे, परंतु ती सर्वसंमतीने झालेली official जाहिरात नाही, याची कृपया नोंद घ्यावी !! या साऱ्या पार्श्वभूमीवर, ५ नोव्हेंबर चा कार्यक्रम दुर्दैवाने रद्द झाला आहे. रसिकांच्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीर आहोत !! परंतु आपलं नातं हे शब्दांतून जुळलेलं आणि शब्दांपल्याड पोचलेलं आहे, या विश्वासासह लवकरच भेटू अशी आशा व्यक्त करतो !! सर्व कलाप्रेमी रसिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. संदीप खरे, वैभव जोशी आणि रसिक साहित्य.