लागिरं झालं जी या मालिकेतील शितलीच्या अप्रतिम नॅचरल अभिनयामुळे अभिनेत्री शिवानी बावकर महाराष्ट्रभर पोहोचली. या मालिकेतील देशावर अपार प्रेम करणारा फौजी अजिंक्य आणि शीतल जी अजिंक्यच्या देशप्रेमावर जीवापाड प्रेम करणारी; अशा या रंजक गावरान बाजातील कथानकाची तिची भूमिका इतकी लोकप्रिय झाली होती की, मालिका संपली असली तरी आजही प्रेक्षक शिवानीला शितली या नावानेच ओळखतात. अभिनेत्री शिवानी बावकरने लागिरं झालं जी, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, मनमंदिरा गजर भक्तीचा, चला हवा येऊ द्या ह्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर शीतल एका नामांकित आयटी कंपनीत भाषा ट्रान्सलेटर म्हणून काम पहात होती. टेलिव्हिजन मालिकांसोबत काही निवडक चित्रपटांमध्येही शिवानीला काम करण्याची संधी मिळाली, त्यात प्रामुख्याने नुकताच प्रदर्शित झालेला युथट्यूब, दगडाबाईची चाळ, उंडगा हे होत. करिअरच्या सुरुवातील शिवानीला काही म्युझिक अल्बम ऑफर झाले होते त्यात खुळाच झालो गं, चाहूल, बरसू दे, वेड्या मनाला, लाजताना अशी नावाजलेले गाण्यांचे अल्बम आहेत. चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून शिवानीने आपल्या अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवला आहे. सोनी मराठी वाहिनीवरील कुसुम या मालिकेमधून ती पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कुसुम मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला होता, यात कुसुम सासर आणि माहेर अशा दोन्ही बाजूंच्या समस्यांना आपली नोकरी सांभाळत खंबीरपणे तोंड देणाऱ्या मुलगी आणि सून अशा भूमिकेत दिसणार आहे.
आजकालच्या या धावपळीच्या युगात मुलीचे लग्न झाल्यावर तिच्यावर माहेरची जबाबदारी नसते असे सर्रास मानले जाते. तेथून पुढे सासरची मंडळीच तिचे आयुष्यभराचे साथीदार असतात अशी एक प्रचलित मान्यता आहे; परंतु याला अपवाद दर्शवत कुसुम दोनही बाजू सांभाळणारी तारेवरची कसरत करणार आहे. अशा या कल्पक कथानकाची मालिका पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नोकरी सांभाळत आई वडील आणि सासरच्या समस्यांना खंबीरपणे तोंड देणारी आजची खरी नारी शक्तीच जणू सीरिअल मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक रटाळ मालिकांना कंटाळले आहेत हे त्यांच्या प्रतिक्रिया पाहून प्रकर्षाने जाणवते; तुलनेत हि मालिका सर्वांचे मनोरंजन करेल असे वाटते.