मराठी मालिका सृष्टीत नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. या बदलामुळे नवख्या कलाकारांना अभिनयाची एक चांगली संधी मिळू लागली आहे. अशातच साधारण दोन वर्षापूर्वी मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता पुन्हा एकदा एका महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शूटिंगचा पहिला दिवस चला करूया सुरू असे म्हणत अभिनेता शाल्व किंजवडेकरने मालिकेत परतल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तो नेमका कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अर्थात शाल्वने त्याच्या आगामी प्रोजेक्टचे गुपित गुलदस्त्यात ठेवलेले आहे. पण येत्या काही दिवसातच मालिकेचे नाव प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून शाल्वने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तो ओमच्या भूमिकेत झळकला होता. एक चॉकलेट हिरो म्हणून त्याने मालिकेत नवी ओळख बनवली होती. हंटर, डेड एन्ड अशा चित्रपटातून शाल्व बालकलाकार म्हणून झळकला होता. त्यानंतर बकेट लिस्ट आणि एक सांगायचंय अशा चित्रपटातून तो मराठी सृष्टीकडे वळाला. गोंदया आला रे, येऊ कशी तशी मी नांदायला अशा काही प्रोजेक्ट मधून झळकला. शाल्व आता लवकरच प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता शाल्व पुन्हा एकदा मालिकेकडे वळलेला पाहायला मिळतो आहे. शाल्वने सेटवर मेकअप करतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरून तो मालिकेत परतला असल्याचे सांगितले जाते. तर अनेकांनी झी मराठीच्या मालिकेत झळकणार असेही तर्क लावले आहेत. झी मराठीवर पारू आणि शिवा या दोन नवीन मालिका दाखल होत आहेत. त्यापैकी शिवा मालिकेतून तो छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा एन्ट्री करतोय असे बोलले जात आहे. पण याबाबतचा प्रेक्षकांना लवकरच उलगडा होईल. तूर्तास या नवीन भूमिकेसाठी शाल्व किंजवडेकरचे अभिनंदन.