अंशुमन विचारे हा एक विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवताना दिसला. महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन सारख्या शोमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. खरं तर वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेल्या अंशुमनला अभिनयाची ओढ होती. नाटकातून काम करत असताना त्याला श्वास चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर अंशुमन संघर्ष, स्वराज्य, शिनमा, विठ्ठला शप्पथ चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारू लागला. आपलीच सहकलाकार पल्लवी सोबत त्याचे प्रेम जुळले. एका चित्रपटाच्या सेटवर काम करत असतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
दोघेही एकमेकांना आवडतोय हे त्यांना कळत होतं, तेव्हा अंशुमनने पुढाकार घेत पल्लवीला लग्नाची मागणी घातली. तेव्हा पल्लवीने लगेचच तिचा होकार कळवला. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. अंशुमन त्यावेळी मुंबईतील एका चाळीच्या दहा बाय आठच्या खोलीत राहत होता. आधी मी कुठे राहतो ते बघ आणि मग होकार दे अशी त्याने पल्लविला अट घातली होती. पण पल्लवीने आपण घर घेऊ शकतो असा विश्वास दाखवला. त्यानंतर एका वर्षात दोघांचे लग्न झाले. २०१४ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचा किस्सा खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण अंशुमन आणि पल्लवी दोघे एकमेकांना डेट करतायेत हे त्यांच्या घरच्यांना ठाऊक होते. पण हे लग्न कधी करणार याबद्दल दोघांनी काहीच सांगितले नव्हते. पल्लवी अभिनेत्री असण्यासोबतच वकिलीचा अभ्यास करत होती.
एलएलबीची परीक्षा झाली त्यानंतर पल्लवीने अंशुमन सोबत लग्न करतीये असे घरी सांगितले होते. ५ जूनला आम्ही लग्न करतोय हे १ जूनला पल्लवीने तिच्या घरच्यांना सांगितलं होतं. लग्नाच्या अगोदर केवळ चार दिवसांपूर्वी तिने ही गोष्ट घरच्यांना सांगितल्याने लग्नाची अशी खास तयारी झाली नव्हती. हे लग्न जुळायला सुधाकर चव्हाण यांचा खूप मोठा हातभार होता असे पल्लवी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगते. ते पल्लवीला वडिलांसारखे होते, यासोबतच अंशुमनचे चांगले मित्र होते. आज ते हयात नाहीयेत. पण त्यांचा आमच्या लग्नाला खूप सपोर्ट होता, त्यांच्या पुढाकारानेच आमचं लग्न झालं होतं असे पल्लवी सांगते. मानसिक आधारच नाही तर त्यांनी आम्हाला आर्थिक मदतही केली होती.
परीक्षेच्या वेळी अभ्यास करता करता मी स्नॅपडिल या अँपवरून लग्नाची शॉपिंग केली होती. साधारण ५ हजार रुपयांच्या मी लग्नाच्या ३ साड्या खरेदी केल्या होत्या. ठाण्यतील मार्केटमध्येच मी दागिने खरेदी केले होते. असे एकूण ६ ते ७ हजारात मी लग्नाचा गेटअप केला होता. येऊरला एका मंदिरात अतिशय साध्या पद्धतीने आम्ही लग्न केलं होतं. अंशुमनने हास्यजत्रा सोडली तेव्हा त्याला पल्लवीचा भक्कम पाठिंबा मिळाला. सतत तेच तेच करून त्याला त्या गोष्टीचा कंटाळा आला होता. तेव्हा आपण वरण भात, आमटी भात खाऊन दिवस काढू असे पल्लवीने त्याला साथ देताना म्हटले होते.