कलाकारांना आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी कित्येक तासांचा प्रवास करावा लागतो. मराठी इंडस्ट्रीतील बरेचसे कलाकार पुणे ते मुंबई असा रोजचा प्रवास करत असतात. तर हा प्रवास टाळण्यासाठी अनेजण मुंबईतच कुणा नातेवाईकांकडे किंवा भाड्याच्या घरात राहण्याची सोय करतात. हा सर्व स्ट्रगल करत असताना मुंबईत आपल्याही हक्काचं घर असावं अशी अनेकजण इच्छा व्यक्त करत असतात. त्यांची ही इच्छा म्हाडाने पूर्ण केलेली पाहायला मिळते. स्वस्तात घर मिळावं म्हणून आजवर अनेक कलाकारांनी या पर्यायाची निवड केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापला म्हाडाचे घर मिळाले.
तर आता मराठी सृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीला म्हाडाच्या घरात गृहप्रवेश करण्याची संधी मिळाली आहे. ही अभिनेत्री आहे अश्विनी कासार. अश्विनी कासार गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीत एक अभिनेत्री म्हणून काम करते आहे. कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. कमला या मालिकेने अश्विनीला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. या मालिकेमुळेच अश्विनीला या क्षेत्रात नवी ओळख मिळाली होती. सावित्रीजोती, कट्टी बट्टी, मोलकरीणबाई, तराफा, पिकोलो, एक होतं माळीण अशा चित्रपटातून तसेच मालिकेतून तिला महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. अभिनय क्षेत्रातील या प्रवासात तिला मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर असावे अशी इच्छा होती. कारण स्वतःचे घर सोडून ती कधी मित्रांच्या, नातेवाईकांच्या घरी राहत होती.
हा स्ट्रगल थांबवा आणि आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करावा हे तिचे स्वप्न होते. ते स्वप्न आता सत्यात उतरलेले पाहायला मिळत आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अश्विनीने तिच्या या स्वप्नांचा पाठलाग पूर्ण केला आहे. याबद्दल अश्विनी म्हणते की, “आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे आणि काम करतोय त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं, हे एकतर स्वप्न आहे किंवा कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय! खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांनाही सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच. काही वर्षांपूर्वी बदलापूर पासून सुरु झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या (आणि आता माझ्याही) कुटुंबियांनी, नातेवाईकांनी मला घराची उणीव कधी जाणवू दिली नाही. नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे.
तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे. आज रात्री बेरात्री केलेले प्रवास, तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय. सगळं ‘Worth’ वाटतंय. आता कंबर कसून जास्त छान काम करू ही ताकद या घराने दिली आहे. ‘मुंबई’ ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं असं काहीसं वाटतंय! माझ्या घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा आणि महाराष्ट्र शासनाचे आभार! तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असू. भावना समजून घ्याल याची खात्री आहे.