उदय सबनीस आणि स्निग्धा सबनीस हे कलाकार दाम्पत्य गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. उदय सबनीस यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही स्वतःचं नाव लौकीक केलेलं आहे. कार्टुन कॅरॅक्टर्स, परदेशी चित्रपट असो किंवा दाक्षिणात्य चित्रपटात त्यांनी डबिंगचे काम केलेले आहे. त्यामुळे उदय सबनीस हे नाव आता महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांची लेक देखील आता अभिनय क्षेत्रात भरारी घेताना दिसत आहे. उदय सबनीस यांची लेक समिहा हिला नुकतेच फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
समिहा ही अभिनेत्री असून तिने सोलकढी या लघुपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे. सोलकढी लघुपटात ती शुभांगी गोखले आणि निरंजन कुलकर्णी सोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. हा लघुपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांकडून उत्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. या लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात नावाजले गेले आहे. समिहाने या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन तसेच सहनिर्मिती देखील केलेली आहे. हा अवॉर्ड स्वीकारताना समिहा खूपच उत्साहित होती. आपल्या कष्टाचं चीज झालं म्हणत तिने फिल्मफेअर अवॉर्ड स्वीकारल्यानंतरचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खरं तर एक दिग्दर्शिका म्हणून मनात खूप दडपण आणि एक मोठी शंका होती पण फिल्मफेअरच्या रात्रीच्या वादळात वाऱ्याबरोबर उडून गेली असे म्हटले.
तिने सोलकढी लघुपटातील सहकलाकार तसेच बॅकआर्टिस्टचे तिने धन्यवाद मानले आहेत. समिहाने हनी लेमन अँड टी सिरीजमध्येही प्रमुख भूमिका साकारली होती. या सिरीजमध्येही तिला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. समिहाला नृत्याची विशेष आवड आहे. शाळेत, कॉलेजमध्ये असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला होता. तेजाज्ञा या कपड्यांच्या ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग देखील केले होते. दिग्दर्शनाचा एक अनुभव म्हणून तिने सोलकढी ही शॉर्टफिल्म बनवली. आपल्या पहिल्याच कामगिरीला फिल्मफेअर अवॉर्डने नावाजले जावे यापेक्षा मोठे भाग्य काय असावे असे समिहाच्या बाबतीत झाले आहे. त्यामुळे उदय सबनीस यांची लेक आता त्यांच्यासारखीच विविध क्षेत्रात मुशाफिरी करताना दिसत आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी समिहा सबनीस हिचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.