झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे निर्मित सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित नाळ २ हा चित्रपट येत्या १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाळ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. नाळ चित्रपटात चैत्याची आणि त्याच्या खऱ्या आईची भेट अधुरी राहिली होती. या चित्रपटातील बरेचशे प्रश्न अनुत्तरित राहिले होते. पण आता दुसऱ्या भागात तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि आई मुलाची ही भेट देखील घडून आलेली पहायला मिळणार आहे.
महत्वाचं म्हणजे चैत्या आणि त्याच्या दोन भावंडांची मजामस्ती देखील या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. चैत्याची चिमीसोबत छान गट्टी जमते पण मनीला चैत्याचा राग येत असतो. मनी हा दिव्यांग आहे. खरं ही भूमिका साकारणारा बालकलाकार भार्गव जगताप हा खऱ्या आयुष्यातही दिव्यांग आहे. या भूमिकेसाठी अशाच मुलाची निवड करण्यात आल्याने नागराज मंजुळे यांचे मोठे कौतुक होत आहे. तर चिमुरडी चिमी तिच्या निरागस अभिनयाने आणि गोड हसण्याने प्रेक्षकांचीही मनं जिंकत आहे. चिमीची भूमिका बालकलाकार त्रिशा ठोसर हिने साकारली आहे. या चित्रपटात काम करताना त्रिशाची सगळ्या कलाकारांसोबत छान गट्टी जमली आहे.
नागराज मंजुळे यांची तर ती अतिशय लाडकी म्हणून सेटवर वावरत होती. त्रिशा ही बालकलाकार याअगोदर पेट पुराण या वेबसिरीज मध्ये झळकली होती. तर काही हिंदी प्रोजेक्टदेखील तिने केलेले आहेत. नाळ २ हा त्रिशाचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. चैत्या आणि चिमीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांनाही विशेष भावली आहे. चैत्या सोबत जमलेली तिची ही गट्टी मनीला आवडत नसते त्यामुळे मनी तिला चैत्यापासून दूर राहायला सांगतो. ह्या भावना त्रिशाने तिच्या अभिनयाने सुंदर वठवल्या आहेत. त्यामुळे ही चिमुरडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी त्रिशा ठोसरला खूप खूप शुभेच्छा.