चंद्रमुखी चित्रपटानंतर प्रसाद ओक दिग्दर्शन करत असलेला शाहीर पठ्ठे बापूराव हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर चित्रपटाचे आणखी एक पोस्टर लॉन्च करण्यात आले. यात अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे जाहीर झाले. चंद्रमुखी चित्रपटात आपल्यासोबत आदीनाथ कोठारे ऐवजी प्रसाद ओक असावा अशी इच्छा अमृताने व्यक्त केली होती. तिची ही इच्छा पठ्ठे बापूराव चित्रपटातून पूर्ण होत आहे. लोक शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.
अमृताला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने ती खूपच खुश आहे. चित्रपटात पवळाची भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे. शाहीर पठ्ठे बापूराव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हरणाक्ष रेठरे या गावचे. श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर हे त्यांचं मूळ नाव. लहानपणापासूनच त्यांना तमाशाची आवड होती. जात्यावरच्या ओव्या ऐकून ऐकून त्यात त्यांनी बदल घडवून आणले. वाड्यासमोरच तमाशाचा फड असल्याने त्यांना तमाशा पहायची आवड निर्माण झाली. यातूनच ते तमाशासाठी लावण्या लिहू लागले. तमाशामध्ये त्यांचे नाव लौकिक झाले तेव्हा ते पठ्ठे बापूराव म्हणून ओळखले जाऊ लागले. अशातच त्यांना देखण्या नृत्यांगना पवळाची साथ मिळाली. पवळा हिवरगावकर ही रंगभूमीवरची पहिली नृत्यांगना होती.
नामा धुलवडकरांच्या तमाशात त्या पहिल्यांदा नाचल्या होत्या. पवळा अतिशय रूपवान होती, तिला पाहायला गर्दी जमायची. अशातच पठ्ठेनापुरावांचे गीत आणि पवळाचे नृत्य खूप लोकप्रिय झाले. दोघांनी एकत्रित तमाशाचा फड सुरू केला. खूप नावलौकिक झाले. पण कालांतराने त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. आर्थिक संकट ओढवल्याने दोघांनी स्वतःचा लिलाव लावला. मुंबईच्या अबू शेठनी ९०० रुपयांना त्यांचा लिलाव जिंकला. मुंबईतील एल्फिस्टन थिएटरमध्ये त्यांना पाहण्यासाठी तिकीट लावण्यात आले. पुढे बेबनाव झाल्याचे लक्षात येताच पवळाने बापुरावांची साथ सोडली ती कायमचीच. फड सोडून पवळा कायमची त्यांच्या आयुष्यातून बाजूला झाली. तेव्हा पठ्ठे बापूरावांनी दुसऱ्या एका नर्तकीला घेऊन फड चालू ठेवला पण यात त्यांना अपयश मिळाले.
अशातच आर्थिक नुकसान सोसणाऱ्या पठ्ठे बापूरावांनी वयाच्या ७७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. बापुरावांच्या आयुष्यात पवळाचे स्थान खूप महत्वाचे होते. त्यांच्या याच जीवनप्रवासाचा उलगडा शाहीर पठ्ठे बापूराव चित्रपटातून होणार आहे. आबा गायकवाड यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. येत्या काही दिवसातच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल. पण त्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.