काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पोंक्षे ही परदेशात शिक्षण घेऊन भारतात परतली. आपली लेक कुठल्याही अरक्षणाशिवाय स्वकर्तुत्वाने पायलट झाली याचा अभिमान शरद पोंक्षे यांना होता. लेकीच्या या कर्तृत्वावर कौतुकाची थाप म्हणून त्यांनी एक पोस्ट लिहिली होती. आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने परदेशात शिक्षणासाठी मुलाची पाठवणी केली आहे. प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेतील स्त्री भूमिका साकारणारे अमोल बावडेकर यांनी यासंदर्भात नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे.
अमोल बावडेकर हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीशी जोडलेले आहेत. जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून कलेचे शिक्षण घेतल्यानंतर अमोल बावडेकर यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकले. राधा ही बावरी या मालिकेमुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. पांघरून, स्वामीनी, कुंकू टिकली आणि टॅट्यु, बाजीराव मस्तानी, गोळा बेरीज अशा चित्रपट मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. सध्या प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेत ते प्रमुख भूमिका निभावत आहेत. अमोल बावडेकर यांच्या पत्नी प्रेरणा बावडेकर या डॉक्टर आहेत. त्यांचा मुलगा अद्वैत हा पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेला आहे.
मुलाचे कौतुक करताना अमोल बावडेकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, अद्वैत बाळा तू जर्मनीला शिक्षणासाठी गेला आहेस. हे सर्व तू स्वकर्तूत्वावर शिष्यवृत्ती मिळवून केलंस ही अत्यंत कौतूकास्पद बाब आहे. सर्वांच्या शुभेच्छा तुला मिळाल्या आहेतंच, पण माझेही शुभाशिर्वाद तुझ्या सोबत सदैव आहेत. खूप मोठ्ठा हो, खूप सारे प्रेम. खरंतर बरंच आहे लिहिण्यासारखं. पण, आपला फोटो पाहील्यावर पुढे काहीच सुचत नाही. फक्त पहात रहावसं वाटतं, Love u & miss you.