अभिनेत्री ऋजुता देशमुख यांना प्रवासादरम्यान एक विचित्र अनुभव आला आहे. अर्थात हा अनुभव सर्वसामान्यांना तर रोजच अनुभवायला मिळतो. टोल नाक्यावर जास्तीचा टोल आकारल्यामुळे ऋजुताने हे बरोबर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण एकाच रस्त्याने जात असताना केवळ काही वेळासाठी तुम्ही थांबले असाल तर तुम्हाला दोन वेळा टोल आकारला जातो का? याबाबत काही नियम असायला हवेत का असे मत तिने यातून व्यक्त केले आहे. ऋजुता देशमुख सध्या झी मराठीवरील ३६ गुणी जोडी या मालिकेतून काम करत आहे. पण पुण्यात आईवडील, सासू सासरे असल्याने बऱ्याचदा कामानिमित्त तिचे पुण्याला जाणे होते.
मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील अनुभवाबद्दल सांगताना ऋजुता म्हणतात की, मी गेली २५ वर्षे मुंबईत राहते. पण आईवडील सासू सासरे पुण्याला असल्याने त्यांच्याकडे नेहमीच जाणे होते. ३१ जुलै रोजी मी पुण्याला गेले. माझ्यासोबत माझं कुटुंब होतं. लोणावळ्याला एके ठिकाणी मनशक्तीला आम्ही थांबतो तिथे चहा नाश्ता नेहमीच करतो. हे करून आम्ही पुण्याला गेलो. टोलचे मेसेजेस उशिरा येतात. खालापूरला २४० रुपये आणि तळेगावला ८० रुपये घेतात. पण घरी पोहोचल्यानंतर मी मेसेज वाचले तेव्हा त्यातून दोन वेळा २४० रुपये टोल आकारण्यात आला. मी हेल्पलाईनवरून काही मदत घेता येते का ते पाहिलं. तेव्हा माझी कंपलेंट रजिस्टर करण्यात आली. त्यांच्याकडूनही मेल आला त्यात त्यांनी आरसिबुक आणि फोटो वगैरे मागितले. त्यानंतर त्यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया मिळाली नाही.
मी दुसऱ्याच दिवशी मुंबईला जायला निघाले तेव्हा टोळजवल आल्यानंतर मी माझी गाडी बाजूला लावली आणि मॅनेजरशी बोलायचंय असं सांगितलं. तेव्हा ते तिथे आले. मी माझी तक्रार त्यांच्याजवळ बोलून दाखवली त्यावेळी त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की तुम्ही लोणावळ्यात उतरला होतात का? मी दरवेळी पुण्याला जाते तेव्हा लोणावळ्यात थांबतेच असं सांगितलं. त्यावर त्यांनी मला असं सांगितलं की, फास्ट टॅग झालं तेव्हापासून मुंबईहून येताना मुंबई ते लोणावळा २४० रुपये आणि लोणावळा ते पुणे २४० रुपये असे टोलचे दोन भाग झाले आहेत. पण फास्ट टॅग झाल्यापासून माझ्या बाबतीत असं पहिल्यांदाच घडलं होतं. मी अनेकदा असाच प्रवास करते पण त्यांच्याकडे यावर काहीच उत्तर नव्हतं.मी या दोन्हींमधलं अंतर चेक केलं.
मुंबई ते लोणावळा असे ८३ किलोमीटर आणि लोणावळा ते पुणे ६४ किलोमीटर अंतर आहे. म्हणजे या दोन्ही अंतरामध्ये एवढी तफावत असतानाही २४० रुपयेच कसे काय आकारले जातात. याबद्दल नेमके काय नियम आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. २४० प्लस २४० असे टोल आकारनं योग्य आहे का? असा प्रश्न ऋजुताने विचारला आहे. या प्रश्नावर सेलिब्रिटींनी सुद्धा आपल्या सोबतही असंच घडलंय अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर तिच्या चाहत्यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे तिचं कौतुक केलं आहे. सर्वसामान्यांना असे अनुभव अनेकदा येतात, मात्र त्यावर योग्य उपाययोजना आखल्या जात नाहीत. किंवा अशा गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. अर्थात ही किरकोळ रक्कम असली तरी रोजचा प्रवास करणाऱ्या सामान्यांसाठी मोठा भुर्दंडच म्हणावा लागेल असे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.