रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावर असलेल्या इर्शाळवाडीवर चार दिवसांपूर्वी दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण इर्शाळवाडी उध्वस्त झाली. ही बातमी समजताच एनडीआरएफ कडून मदतकार्य सुरू झाले. तर अनेक सामाजिक संस्था आणि ट्रेकर्सने याठिकाणी जाऊन स्वेच्छेने मदतकार्यास हातभार लावला. आतापर्यंत या दुर्घटनेत २७ जण मृत आढळले तर अजूनही ७८ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान या घटनेला आता तीन दिवस लोटले असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सततचा पाऊस, अवजारांची कमतरता आणि दुर्गंधी यामुळे शोधकार्यास अडथळे येत आहेत.
अशा बिकट परिस्थितीत वेगवेगळ्या संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. लालबागच्या राजाकडूनही मदत पाठवली गेली आहे, तर मराठी सृष्टीतील संवेदनशील अभिनेत्री जुई गडकरी हिनेही इर्शाळवाडीकडे मदत पाठवली आहे. अनेकदा ती आपल्या मित्रांसोबत इर्शाळगडावर ट्रेकिंगला जात असे. या वाडीतील लोकांच्या घरात ती काही काळ घालवत असे, तिथल्या जेवणाची चव जुईने चाखली आहे. त्यामुळे इर्शाळवाडीतील लोकांसोबत जुईचं भावनिक नातं जुळलं होतं. ठाकरं आणि ठाकरवाड्या हा तिच्या खूप जवळचा विषय होता. इथली घरं अतिशय साधी पण तेवढीच देखणी होती असे जुई मागे म्हणाली होती. प्रसार माध्यमातून इर्शाळगडाची घटनेचे गांभीर्य पोचविण्यात आले होते.
या वाडीवर दरड कोसळली हे कळताच जुईने भावनिक पोस्ट लिहीत इथली लोक सुखरूप असुदेत अशी प्रार्थना केली होती. मदतकार्य आणि स्थानिक रहिवाश्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने सर्व स्तरातून यंत्रणा काम करीत आहे. घटनेची भीषणता जास्त असल्याने शक्य तेवढी मदत लवकरात लवकर मिळावी याच हेतूने जुईने तिथल्या लोकांसाठी जेवण, औषध, कपडे, चादर तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत पोचवली आहे. इतकेच नव्हे तर इतरांनाही जे काही शक्य असेल ती मदत करण्याचे आवाहन करत आहे. तुम्ही केलेली मदत माझी टीम पोहोचवण्याचे काम करेन असेही जुई गडकरीने म्हटले आहे. जुईच्या या आवाहनाला रसिक लोकांकडून आणि डेलिब्रिटींकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.