ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. काल १४ जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविंद्र महाजनी हे ७७ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते. घरातून वास येऊ लागल्याने त्यांच्या घराचे दार तोडण्यात आले तेंव्हा रविंद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. तीन दिवसांपूर्वीच रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते.
त्यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे त्यात त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान ही बातमी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला कळवण्यात आली असून तो तातडीने कुटुंबासह तळेगाव दाभाडे येथे पोहोचला आहे. चित्रपटात येण्याअगोदर रविंद्र महाजनी हे मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवायचे. त्यांना पुढे चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली होती. हळदी कुंकू, झुंज, मुंबईचा फौजदार, चांदणे शिंपित जा, थोरली जाऊ, गल्ली ते दिल्ली, सर्जा, माहेरची माणसे, सुळावरची पोळी अशा चित्रपटातून एक दमदार आणि देखणा नायक म्हणून त्यांनी ओळख बनवली होती. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही नशीब आजमावले होते मात्र त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही म्हणून ते पुन्हा मराठी सृष्टीकडे वळले.
रविंद्र महाजनी आणि मुलगा गश्मीर यांच्यात घरगुती वाद होते. गश्मीर कधीच वडीलांबद्दल काहीच बोलत नसे. कधी काळी रविंद्र महाजनी कर्जाच्या खाईत अडकले होते. त्यातून गश्मीरने कुटुंबाला सावरण्याचा मोठा प्रयत्न केला होता. पण गेली अनेक वर्षे तो वडीलांपासून वेगळा राहत होता. रविंद्र महाजनी हे सुद्धा मराठी सृष्टीतून बाजूला झालेले पाहायला मिळाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रविंद्र महाजनी यांच्या अचानक मृत्युच्या बातमीने मराठी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी हळहळ व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.