प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने बाईपण भारी देवा या चित्रपटाची यशस्वीपणे घोडदौड सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कोटींची उड्डाणे केली आहेत. कालपर्यंत चित्रपटाने ३६ कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळवले आहे. या चित्रपटातील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यात साधनाच्या सुनेने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेले पाहायला मिळाले. ही भूमिका एका अमराठी अभिनेत्रीने साकारली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे रिया शर्मा. रिया शर्मा हिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. पण हिंदी सृष्टीत तिला मोठी लोकप्रियता मिळालेली आहे.
हिंदी मालिका सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून रिया ओळखली जाते. सध्या तिची ध्रुव तारा ही मालिका खूपच गाजली आहे. पिंजरा खूबसुरती का, काशीबाई बाजीराव बल्लाळ, सात फेरों की हेरा फेरी, महाराज की जय हो, इश्क में मर जावा अशा मालिकांमधून रिया प्रमुख भूमिकेत झळकली आहे. रिया शर्मा हिचे बालपण आणि शिक्षण नागपूर येथे झाले त्यामुळे मराठी भाषा तिला थोडीफार अवगत आहे. तिची आई प्रतिमा शर्मा या युट्युबर आहेत. रियाने पदवीचे शिक्षण झाल्यानंतर मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. काही जाहिरातींमध्ये तिला झळकण्याची संधी मिळाली. सात फेरों की हेरा फेरी मालिकेत तिला प्रमुख भूमिका मिळाली. त्यानंतर रियाचा अभिनय क्षेत्रातला आलेख चढताच राहिला. बाईपण भारी देवा या चित्रपटात तीने साधनाच्या सुनेची भूमिका साकारली.
माधवी भोसले हे पात्र साकारताना रियाला मोजकेच डायलॉग देण्यात आले होते. आजोबांच्या विरोधामुळे माधवी घराबाहेर पडल्यानंतर डान्सची आवड जोपासायची. हे साधनाच्या लक्षात आल्यावर तिनेच आपल्या सुनेला मंगळागौर स्पर्धेत सहभागी करून घेतले. आजवर मी या घरात मन मारून जगत आले, मात्र आता माझ्या सुनेने तिची आवड जोपासावी या विचारांनी साधना धीट बनली. आणि सासऱ्यांच्या विरोधाला न जुमानता मंगळागौर स्पर्धेत सुनेसह सहभागी झाली. रियाने माधवीचे पात्र उत्तम साकारलेले पाहायला मिळाले. तिच्या रूपाने एक नवीन चेहरा मराठी सृष्टीला मिळाला. अमराठी असूनही रियाला मराठी चित्रपटात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण हिंदी सृष्टीत तिने नायिका म्हणून मोठी लोकप्रियता मिळवलेली आहे. भविष्यात मराठी सृष्टीत आणखी काही प्रोजेक्ट करण्याची तिची इच्छा आहे.