गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम ओक्के हाय हे वाक्य परवलीचं बनलं. महाविकास आघाडीतील बंडाळी करून फुटलेल्या आमदारांनी गुवाहाटी मुक्कामी गेले होते. तिथून एका कार्यकर्त्याला खुशालीचा फोन करून, काय डोंगार, काय झाडी, काय हॉटेल, एकदम ओक्केमधी हाय सगळं. असं सांगणारे आमदार शहाजीबापू पाटील सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ स्थापन होताच चार खोके एकदम ओके या डायलॉगने लक्ष वेधलं. राजकारणातील हेच नाव आता एक सिनेमाच्या पोस्टरवर झळकणार आहे.
अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी ही हटके जोडी खोक्यातील ओक्केवाली लव्हस्टोरी घेऊन येणार आहे. सध्या मराठी सिनेमात अनेक हटके विषय आणले जात आहेत. वेबसीरीजमध्येही मराठीत आजपर्यंत न दाखवलेल्या वेगळ्या आणि बोल्ड विषयांच्या कथा मांडल्या जात आहेत. याच पंक्तीत एक दोन तीन चार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नावापासूनच वेगळेपणाची झलक असलेल्या या सिनेमात नेमकं काय पहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढली आहे. सोशल मीडियावर नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सोफ्यावर अघळपघळ बसलेले वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी भाव खाऊन जात आहेत. एक दोन तीन चार या सिनेमाच्या नावातील चौघेजण कोण आहेत असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला नसता तरच नवल.
टीझरमध्ये चार खोके दाखवण्यात आल्याने नेमकं खोक्याचं प्रकरण काय आहे. हा प्रश्नही प्रेक्षकांना या सिनेमाकडे खेचून आणू शकतो. नेहमीच काहीतरी वेगळं देणाऱ्या वरूण नार्वेकर याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर वेबसीरीजच्या मांडणी अफलातून काम करणारा. नाटकाच्या दिग्दर्शनाची नस माहिती असणारा निपुण धर्माधिकारी या सिनेमाच्या निमित्ताने कॅमेऱ्यामागे नव्हे तर कॅमेऱ्यासमोर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मी वसंतराव या सिनेमाचं दिग्दर्शन निपुणने केलं होतं. याशिवाय अडलय का हे नाटक असो किंवा हिंग पुस्तक आणि तलवार ही वेबसीरीज असो, निपुणच्या वेगळया धाटणीच्या दिग्दर्शनाचे लाखो फॅन्स आहेत.
डॉ काशीनाथ घाणेकर सिनेमातील कांचनच्या भूमिकेचं शिवधनुष्य पेलणारी वैदेही परशुरामी. हिने गेल्या काही सिनेमातून अभिनयाचं वैविध्य दाखवलं आहे. झोंबिवली सिनेमातील तिचा वेडेपणाही चाहत्यांना खूप आवडला. आता एक दोन तीन चार या सिनेमातून वैदेहीचा नवा अंदाज पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर झाले आहेत. वैदेही आणि निपुण यांच्या टीझरचा रिल्सवर नेटकऱ्यांनी उत्सुक आहोत अशा प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे एक दोन तीन चार या सिनेमाच्या टीमलाही खूपच हुरूप आला आहे.