स्टार प्रवाह वाहिनी गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरली आहे. या वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. त्यामुळे झी मराठी आणि कलर्स मराठी वाहिन्यांना टॉप दहाच्या यादीत स्थान मिळवणे कठीण झाले आहे. मात्र असे असले तरी मालिकेच्या वाढीव कथानकाचा प्रेक्षकांना कायमच तिटकारा येतो. मालिका आवडते म्हणून कथानक वाढवण्यासाठी लेखक नको ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे अशा मालिकांनी आटोपते घेणंच योग्य असतं अशी प्रतिक्रिया अनेकदा व्यक्त केली जाते. स्टार प्रवाहवरील तिझेच मी गीत गात आहे या मालिकेला एक ठराविक कथानक आहे. मल्हारला त्याचे कुटुंब पुन्हा कधी भेटणार अशा आशयाची ही मालिका आहे.

मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अडचणींमुळे ही मालिका पुढे सरकण्याचे नावच घेत नाहीये. स्वराजला आपले बाबा कोण आहेत हे माहीत असूनही या मालिकेत लपवाछपवी सुरू झाली आहे. आता तर मंजुळाच्या रूपातली स्वराजची आई देखील या मालिकेत दाखल झाली आहे. मंजुळा तिचे हिरे शोधण्यासाठी मल्हारच्या घरात राहायला आली,पण अजूनही मल्हारला प्रत्यक्षात दिसलेली नाही. स्वराजचा मामा, क्षमा मावशी, विजय, आजी हे सर्व जण स्वराची ओळख लपवून ठेवताना दिसली. आता तर चक्क स्वराने देखील मंजुळा आपली आई आहे हे सर्वांपासून लपवून ठेवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे मालिकेतली ही सगळी लपवाछपवी आता प्रेक्षकांना असह्य झाली आहे. अर्थात मालिकेचे कथानक अजून खूप पुढे जाणे अपेक्षित आहे.

पण गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका आहे त्याच ठिकाणी अडकून राहिलेली पाहायला मिळते. मल्हारच्या कुटुंबियाने स्वराचा त्याची मुलगी असल्याचा लवकरात लवकर स्वीकार करावा, ती मोठी गायिका बनावी. मल्हारचे नाव मोठे करावे असे बरेचसे कथानक पुढे असताना मालिकेत लपवाछपवीचे ट्विस्टवर ट्विस्ट घुसडले जात आहेत. अनेकदा स्वरा मल्हारला तिची ओळख सांगायला जाते, मात्र दरवेळी क्षमा मावशी नाहीतर मामा तिची अडवणूक करताना दिसतात. तर दुसरीकडे आता मंजुळा देखील मल्हारसमोर येऊ पाहते मात्र त्यातही कोणी ना कोणी आडकाठी आणताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांचाही दरवेळी अपेक्षभंग झालेला आहे. आणि म्हणूनच आता मालिकेवर प्रेक्षकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा सगळा गोंधळ लेखकाने लवकरात लवकर आटोपता घ्यावा आणि मालिकेचे कथानक पुढे सरकावे अशी मागणी केली जात आहे.
ईतकी बिनडोक सिरियल यापूर्वी कधीही पाहिली नाही.सिरियल वाढविण्यासाठी ईतकी लपाछपी. असं प्रत्यक्षात शक्यच नाही हे शेंबडं पोरही सांगु शकेल.बंद करा ही सिरियल आता