कोलीवूड प्रोडक्शन या निर्मिती संस्थेतून आजवर अनेक कोळीगीतं, लोकगीतं, एकविरा आईची गाणी तसेच बाप्पाची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर, सण आयलाय गो, आईविना मला करमत नाही. माझा बाप्पा किती गोड दिसतो, देवबाप्पा ही त्यातील काही गाणी प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतली होती. प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. आपल्या सुरेल संगीताने त्यांनी आजवर अनेक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याचमुळे प्रवीण कोळी हे नाव कोलिवुड सृष्टीत लोकप्रिय होत आहे.
प्रवीण कोळी हे गायक, संगीतकार म्हणून ओळखले जातात. अल्पावधीतच त्यांनी संगीत क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे यात त्यांना योगिताचीही साथ मिळाली आहे. प्रवीण कोळी यांच्या गाण्यात मराठी सृष्टीतील कलाकारांना झळकण्याची संधी मिळाली आहे. आमच्या पप्पाने गणपती आणला या गाण्यावर रील बनवून रातोरात स्टार झालेल्या साईराजसाठीही त्यांनी देवबाप्पा हे गाणं तयार केलं आणि त्यात त्याला झळकण्याची संधी देऊ केली. यशाचा एक एक टप्पा सर करत असताना प्रवीण कोळी यांनी पहिल्यांदाच आपली पहिली वहिली कार खरेदी करून हा आनंद साजरा केला आहे. आई एकविरा आणि बाप्पाच्या कृपेने कोलीवूड परिवारात पहिली गाडी दाखल झाली असे म्हणत प्रवीण कोळी यांनी आपल्या पहिल्या गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ ही तब्बल २२ ते २५ लाख किंमतीची गाडी त्यांनी खरेदी केली आहे. प्रवीण कोळी यांचे बालपण बेलापूर ठाण्यात गेले. विद्या प्रसारक शाळेतून त्यांनी आपले शिक्षण घेतले. संगीताची आवड असल्याने यातच करिअर करायचं असा निश्चय त्यांनी केला. गोव्याच्या किनाऱ्यावर या त्यांच्या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नवरात्रीची गाणी, कोळी गाणी अशा माध्यमातून त्यांनी संगीत क्षेत्रात नावलौकिक केले. आज कोलीवूड परिवारात पहिली गाडी दाखक झाल्याचा त्यांना मोठा आनंद झाला आहे. ही पहिली गाडी लक्ष्मीच्या रूपाने आपल्या कुटुंबात दाखल झाली असे म्हणत प्रवीण कोळी यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यावर सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो.