पूजा सावंत सिद्धेश चव्हाण सोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात मी लग्न करतीये असे पूजाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. नोव्हेंबर महिन्यात पूजाने एक खास फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची बातमी जाहीर केली होती. तेव्हा तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हील केला नव्हता. पाठमोऱ्या बॉयफ्रेंडला पाहून अनेकांनी हा भूषण प्रधान आहे किंवा वैभव तत्ववादी आहे असे तर्क लावले होते. ही दोन नावं येणार हे पूजाला अगोदरच माहीत होते.

पण यात आणखी एका तिसऱ्या नावाची भर पडली याबद्दल तिलाही काहीच कल्पना नव्हती. आरजे सोनालीला दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने या तिसऱ्या नावाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. ती म्हणते की, मी जेव्हा सिद्धेशचा पाठमोरा फोटो टाकला तेव्हा वैभव आणि भूषण ही नावं येणार याची मला कल्पना होती. कारण बऱ्याचदा पूजा सावंतने या दोघांसोबत एकत्रित काम केलेले होते. त्यामुळे पूजा सावंतचे नाव त्यांच्याबरोबर जोडण्यात आलेले होते. पण जेव्हा लोकांनी तिसरे नाव घेतले तेव्हा मला या नावाबद्दल कल्पना नव्हती असे ती म्हणते. हे तिसरे नाव म्हणजे आदिनाथ कोठारे. पाठमोरी व्यक्ती आदिनाथ कोठारे असावी असा अनेकांनी अंदाज बांधला.

कदाचित त्यांना तो तसा दिसला असावा मला या नावाबद्दल कल्पना नव्हती असे पूजा म्हणते. मी सिद्धेश सोबत लग्न करतीये हे कोणालाच माहीत नव्हते. हे मी फक्त गश्मीरची पत्नी गौरीला सांगितले होते. भूषण आणि वैभव पासूनही मी हे लपवून ठेवले होते. पण ज्या गोष्टी घडणार आहेत त्या देवाच्या मर्जीने घडत असतात. माझं त्याच्याशी लग्न व्हावं ही त्याची इच्छा असावी तसंच ते घडतंय असे पूजा तिच्या अरेंज मॅरेजबद्दल सांगते. काही दिवसांपूर्वी पूजाने सिद्धेश कोण आहे आणी तो काय करतो याबाबत खुलासा करताना म्हटले होते की, सिद्धेशचा या इंडस्ट्रीशी अजिबात संबंध नाहीये. तो खूप हुशार मुलगा आहे, कामाशी काम असणारा मुलगा आहे. आमचं लग्न हे मॅट्रिमोनी साईटवरून ठरलं.
मी त्याचा पहिल्यांदा फोटो पाहिला तेव्हा मी त्याच्या प्रेमातच पडले होते. मग त्याच्याशी बोलणं होत होतं तसा तो मला आवडू लागला. कित्येक दिवस तर आम्ही भेटलोही नव्हतो. याचदरम्यान मी अभिनेत्री आहे हेही सिद्धेशला माहीत नव्हते. जेव्हा त्याच्या आईने एका अभिनेत्रीचं स्थळ आलंय असं सांगितलं तेव्हा त्याने मला सोशल मीडियावर सर्च केलं. आम्ही भेटलो आणि दोघांना जेव्हा वाटलं की आता आपण लग्न करू तेव्हा आम्ही हे घरी सांगितलं. त्यानंतर पूजाने सिद्धेश सोबतचा तो फोटो पोस्ट करत लग्न ठरल्याचे जाहीर केले.