४ जून रोजी अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस त्यांच्या पाठोपाठ आज ६ जून रोजी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांचा वाढदिवस आहे. निवेदिता सराफ यांच्या आजच्या वाढदिवसादिनी त्यांच्या कुटुंबाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… निवेदिता जोशी सराफ या बालपणापासूनच नाटकांतून आणि चित्रपटातून कासम करत असत. अभिनयाचा वारसा त्यांना त्यांचे वडील गजन जोशी यांच्याकडून मिळाला आहे. गजन जोशी यांनी ७० च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्य कांक्षीनि अशा चित्रपटातून अभिनय साकारला आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत निवेदिता सराफ यांनी “अपनापन” या हिंदी चित्रपटात अभिनय साकारला. “आदमी मुसाफिर है…” हे गाणं निवेदिता सराफ यांच्यावर चित्रित झालं होतं त्यावेळी त्यांचे वय अवघे १३ वर्ष असल्याचे सांगितले जाते. जलन, परिवर्तन या आणखी काही हिंदी चित्रपटात झळकल्यानंतर नवरी मिळे नवऱ्याला या मराठी चित्रपटात त्यांना महत्वाची भूमिका मिळाली. धूम धडाका, इरसाल कार्टी, अशी ही बनवाबनवी, लपवाछपवी अशा अनेक हिट चित्रपटाची नायिका त्यांनी साकारली. बालकलाकार ते चित्रपटाची नायिका असा त्यांचा प्रवास सुरु असताना अनिकेतच्या जन्मानंतर त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला मात्र त्यानंतर देऊळ बंद, अग्गबाई सासूबाई, अग्गबाई सुनबाई या मालिका साकारून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.
१९९० साली निवेदिता जोशी यांनी अशोक सराफ यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी त्यांची थोरली बहीण डॉ मीनल परांजपे यांनीच पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला होता. डॉ मीनल परांजपे या देखील मराठी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी अभिनय साकारला आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. “अरण्यक” या गाजलेल्या नाटकातून मीनल परांजपे यांनी कुंतीची भूमिका साकारली होती. २०१९ सालच्या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २००१ सालच्या अमोल पालेकर दिग्दर्शित “ध्यासपर्व” या चित्रपटातून त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. योजना प्रतिष्ठान तर्फे ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यात मीनल परांजपे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. आज अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांचा ५६ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना कलाकार.इन्फो टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा!!!…