जुनून आणि बुनियाद मालिका फेम दिग्गज अभिनेते मंगल सिंग ढिल्लोन यांचे आज रविवारी कॅन्सरने दुःखद निधन झाले आहे. ढिल्लोन यांच्यावर काही दिवसांपासून लुधियानाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्याबाबत अधिक काळजी व्यक्त केली जात होती. बॉलिवूड अभिनेत्री रेखा ते डिंपल कपाडिया सोबत त्यांनी काम केले होते. सोबतच अनेक कलाकारांनी भेट दिली होती. पंजाबी चित्रपट सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

हिंदी मालिका चित्रपटातून त्यांच्या भूमिका खूपच उल्लेखनीय ठरल्या होत्या त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेता यशपाल शर्माने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची ही बातमी शेअर केली होती. मंगल ढिल्लोन यांनी एकाच वेळी टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीत काम केले होते. १९८६ च्या बुनियाद शोमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केली. १९८८ मध्ये रेखाची मुख्य भूमिका असलेल्या खून भरी मांग या चित्रपटात मंगल सिंग धिल्लोन यांनी वकिलाची भूमिका साकारली होती. त्याअगोदर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. मध्यंतरी बराच काळ त्यांनी टेलिव्हिजन आणि सिनेमा दुनियेतून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता.

सोबतच १९९३ मध्ये जुनून मालिकेतून ते छोट्या पडद्यावर परतले. या मालिकेमध्ये त्यांनी सुमेर राजवंशची भूमिका गाजवली होती. २००० मध्ये आलेल्या नूरजहाँ या टीव्ही मालिकेमध्येही त्यांनी अकबरची मुख्य भूमिका साकारली होती. प्यार का देवता, रणभूमी, स्वर्ग यहाँ नरक यहाँ, विश्वात्मा, दिल तेरा आशिक, ट्रेन टू पाकिस्तान हे त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्वाचे चित्रपट होते. २००३ मध्ये फरदीन खान स्टारर जनशीनमध्येही मंगल सिंग धिल्लोन दिसले होते. त्यानंतर अलीकडे २०१७ मध्ये तुफानसिंग चित्रपटात लाखा हि भूमिका त्यांनी गाजवली होती. अशा या हरहुन्नरी कलाकारास सेलिब्रिटी जगतातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.