Breaking News
Home / जरा हटके / ​लैच लवकर गेलास रं भावा.. अभिनेते किरण माने भावुक
satish tare
satish tare

​लैच लवकर गेलास रं भावा.. अभिनेते किरण माने भावुक

हेमांगी कवी, किरण माने मराठी सृष्टीतील ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत कुठल्या ना कुठल्या विषयावर आपल्या भावना व्यक्त करत असतात. अशातच किरण माने यांनी दिवंगत अभिनेते सतीश तारे यांची खास आठवण सांगितली आहे. येड्यांची जत्रा, नवरा माझा भवरा, नवरा माझा नवसाचा, बालक पालक, वळू, एक होता विदूषक अशा चित्रपटातून सतीश तारे यांनी विनोदी ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. विनोदाचे अचूक टायमिंग हेरणाऱ्या सतीश तारे यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. अशातच ३ जुलै २०१३ रोजी यकृताचा विकार झाल्याने त्यांचे निधन झाले होते. सतीश तारे यांचा आज स्मृतीदिन, आठवणी जाग्या करणारी ही बोलकी प्रतिकिया खूप काही सांगून जाते.

satish tare
satish tare

आमच्यातनं जाऊन तुला आज नऊ वर्ष झाली! नाटकात तू खाली पडल्यावर, शरीराची खत्त्तरनाक नागमोडी वळणं घेत वर उसळी मारायचास. टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. तशीच ही आठवण ‘सर्रकन’ वर आलीय भावा. तुला काय म्हणू गड्या? अष्टपैलू? हरहुन्नरी? गुणी? अफलातून कलंदर अवलिया? नाय नाय, ही सगळी विशेषणं फिकी पडतील इतका महान होतास तू! पण बेफिकीरपणे जगलास आणि त्याच बेफिकीरीने गेलास. आम्हा सगळ्यांचं डोंगराएवढं नुकसान करून ठेवलंयस माहितीय का तुला? तू कधीच कुणाची नक्कल केली नाहीस. स्वत:ची एक वेगळीच श्टाईल असलेला खराखुरा विनोदवीर होतास तू. साध्या वाक्यांच्याही विशिष्ठ उच्चारातून, बिनचूक शब्द फोडीतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तुझ्यासारखा अफाट नट मी आजवर पाहिला नाही.

satish tare kiran mane
satish tare kiran mane

तुझी ‘आंगीक लवचिकता’ केवळ अफलातून! नादखुळा! जबराट!. तू निव्वळ ‘महान’ अभिनेता होतास. उत्तम लेखक दिग्दर्शक गायक वादक ‘ऑल इन वन’ होतास राव! हार्मोनियम, गिटार, तबला अशा वाद्यांवर सफाईनं हात फिरायचा तुझा. पण अनेक मनस्वी कलावंतांना असलेला एक ‘शाप’ तुलाही होता. नाहीतर ही वेळ होती का यार जायची? आज किती नाट्यरसिकांना माहिती असंल की आपण काय गमावलंय. आपल्यातनं जो गेला तो किती ‘महान’ होता माहितीय? बोलता बोलता कधी मी सतीश तारेची तुलना चार्ली चॅप्लीन आणि जिम कॅरीशी केली. तर तुला फारसं न पाहिलेल्या लोकांना वाटतं ‘किरण माने जरा अतीच कौतुक करतोय’.

मी जेव्हा कधी विनोदी नाटक बघतो, तेव्हा क्वचित कधीतरी ‘हा रोल सतीश तारेने केला असता तर!?’. हा विचार मनाला शिवला तरी मी पुढचं नाटक पाहू शकत नाही! मी कुणाला कमी लेखत नाही. आजही चांगले शैलीदार विनोदवीर आपल्यात आहेत. पण तरीही ‘सतीश तारे’ या अवलियाचे जबराट छप्परतोड ‘परफाॅरमन्सेस’ ज्यांनी पाहिलेत, त्यांना माझं म्हणणं मनापास्नं पटंल. असो, तरीही आज मी लै लै हसणारय सतीश. खळखळून मनापासून हसणारय. कारण आज मी तुझं ‘ऑल लाईन्स क्लीअर’ हे नाटक बघणारय. डोळ्यात पाणी येईपर्यन्त हसणारय. लैच लवकर गेलास रं भावा. एवढा ‘टायमिंग’चा बाप तू. पण ‘जाण्याचं’ टायमिंग चुकवलंस दोस्ता. तुला प्रत्यक्ष भेटून चिक्कार वेळा केलाय. आज परत एकदा तुला कडकडीत सलाम, लब्यू.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.