सोनी मराठी वाहिनीवर मराठी इंडियन आयडलचा पहिला सिजन प्रसारित केला जात आहे. कैवल्य केजकर, भाग्यश्री टिकले, अविनाश जाधव, शुभम खंडाळकर, अमोल सकट, ऋषिकेश शेलार, श्वेता दांडेकर, चैतन्य देवढे, आम्रपाली पगारे, जगदीश चव्हाण, अश्विनी मिठे, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे आणि सुरभी कुलकर्णी या टॉप १४ स्पर्धकांनी आपले या स्पर्धेसाठी स्वतःचे स्थान निश्चित केले आहे. येथून पुढे या प्रत्येक स्पर्धकांना आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. सुरांची मैफिल सजवीत दर आठवड्याला एक एक कलाकार यातून निरोप घेताना पहायला मिळतील अर्थात सर्वोत्तम गायक विजयाची वाटचाल पुढे चालू राहणार आहेच.

इंडियन आयडल हिंदी या लोकप्रिय रिऍलिटी शोची लोकप्रियता पाहता, मराठीतूनही हा शो सुरू व्हावा अशी अपेक्षा होती. त्यातुन अजय अतुल या संगीतकाराची जोडी परिक्षकाची भूमिका निभावणार म्हटल्यावर, त्यांच्याकडून दर्जेदार गायक निवडले जातील याची शाश्वती मिळाली. गेल्या आठवड्यात स्पर्धकांनी दिलखुलास गाणी गाऊन प्रेक्षकांची मनं जिकली होती. त्यात १४ वर्षाच्या आम्रपालीला तिने परिधान केलेला ड्रेस आणि एक टॅब भेट म्हणून देण्यात आला होता. तर ह्या आठवड्यात दिग्गज गायिका अनुराधा पौडवाल यांनी हजेरी लावत गायकांचे कौतुक केले आहे. कालच्या भागात कैवल्य केजकर याने अष्टविनायक या चित्रपटातील पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आणि अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं ‘दाटून कंठ येतो…’ हे गीत सादर केलं. कैवल्य केजकर याने हे गाणं अतिशय सुरेखपणे सादर करून प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच, शिवाय हे गाणं संपताच अनुराधा पौडवाल खूपच भावुक झाल्या आणि मंचावरून त्या बाहेर निघून गेल्या.

यावर अजय अतुल यांनी ‘त्या इथून निघून गेल्या हीच तुझ्या उत्कृष्ट गायनाची पावती आहे’ असे म्हणत कैवल्य केजकरच खूप कौतुक केलं. हा भारावलेला क्षण अनुभवताना उपस्थितांच्या आणि कैवल्यच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं होतं. त्यानंतर थोड्या वेळाने अनुराधा पौडवाल पुन्हा मंचावर उपस्थित झाल्या होत्या. आपल्या गाण्याने कोणीतरी भारावून जातंय ही त्या कलाकारासाठी खूप मोठी पावती ठरत असते तो अनुभव स्वतः कैवल्यने पहिल्याच आठवड्यात मिळवला आहे. कैवल्य प्रमाणे कालच्या भागात आम्रपालीने दिल है की मानता नहीं.. हे गाणं गायलं होतं. त्यावेळी अनुराधा पौडवाल यांनी या गाण्याच्या संबंधित काही खास आठवणी सांगितल्या होत्या. चित्रपटा व्यतिरिक्त त्यांनी अशी बरीच गाणी गायली होती. ती गाणी घेऊन चित्रपटाचे कथानक बनवण्यात आले होते असा एक किस्सा त्यांनी सांगितला होता, तर आम्रपालीने गायलेलं गाणं देखील खूप सुरेख झालं असं म्हणत त्यांनी तिचं कौतुक केलं होतं.