कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळेच ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मल्हार आणि श्वेताची जुळून आलेली केमिस्ट्री आता प्रेक्षकांना संध्याकाळी ६.३० वाजता पाहायला मिळणार आहे. कारण या मालिकेच्या जागी काव्यांजली ही मालिका प्रसारित केली जात आहे. जीव माझा गुंतला मालिकेत आता खूप मोठा बदल घडून येणार आहे. मालिका तब्बल सहा वर्षे लीप घेत असल्याने मालिकेचे कथानक बरेच पुढे सरकणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

यावेळी मात्र अंतरा पुन्हा एकदा आपली रिक्षा चालवताना दिसते आणि मल्हारचा शोध घेत फिरत असते. तिकडून मल्हार डॅशिंग अंदाजात आलेला पाहून अंतरा त्याच्याजवळ जाते. तेव्हा मल्हार अंतराला ओळखण्यास नकार देतो. तेवढ्यात गाडीत बसलेला एक चिमुरडा मल्हारला बाबा म्हणून हाक मारतो. हा चिमुरडा मल्हार आणि अंतराचा मुलगा पार्थ असतो. मात्र मल्हार अंतराला ओळखत नसल्याचे दाखवल्याने त्याची स्मृती गेली की काय असा प्रश्न आता मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे मल्हारची स्मृती परत मिळवण्यासाठी अंतरा आता काय काय प्रयत्न करणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान मालिकेचा हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनी मालिकेची तुलना माझी तुझी रेशीमगाठ मालिकेशी केली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरू ठेवण्यात आली होती. पण कथानक वाढवायचे म्हणून नेहाचा अपघात होऊन त्यात स्मृती गेली असे दाखवण्यात आले होते. परंतु या अनपेक्षित ट्विस्टमुळे बऱ्याच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. असाच काहीसा प्रकार या मालिकेबाबत घडत आहे. कथानक वाढवण्यासाठी मल्हारची स्मृती घालवून ही मालिका तशीच चालू ठेवली जाणार आहे. काव्यांजली या नवीन मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा जीव माझा गुंतला ही मालिका निरोप घेणार असे अपेक्षित होते. मात्र तसे न करता जीव माझा गुंतला मालिकेचा वेळ बदलण्याचा घाट कलर्स मराठीने घातला. त्यामुळे आता प्रेक्षक जीव माझा गुंतला मालिकेच्या ट्विस्टला कितपत प्रतिसाद देतात ते पाहावे लागेल.