मराठी चित्रपटात धडाकेबाज भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचे अनेक वर्षानंतर मराठी सृष्टीत पाऊल पडले आहे. नुकतेच झी मराठीवरील हे तर काहीच नाय या मंचावर त्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. हे तर काहीच नाय या शोच्या आजच्या भागात बरेचसे कलाकार आपले अनुभव शेअर करून प्रेक्षकांना हसायला लावणार आहेत. यात प्रामुख्याने शुक्रवार आणि शनिवारच्या विशेष भागात सुषमा शिरोमणी, सयाजी शिंदे, अंकुश चौधरी, रेशम टिपणीस, राजकिय क्षेत्रातील मान्यवर, रुपाली ठोंबरे पाटील, अशोक नायगावकर या कलाकारांनी आणि राजकीय मंडळींनी, सेलिब्रेटींनी हजेरी लावुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सुषमा शिरोमणी या देखील आपले अनुभव शेअर करताना या शोमध्ये दिसणार आहेत. १९७६ ते १९८६ या काळात त्यांनी चित्रपट अभिनित केले होते त्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी त्या पुन्हा मराठी सृष्टीत हे तर काहीच नायच्या मंचावर पाऊल टाकताना दिसत आहेत. त्यावेळी रेखाने त्यांच्या चित्रपटात कुठं कुठं जायाचं हनिमूनला या गाण्यात नृत्य केले होते हे नृत्य चित्रीकरण होणार होते त्यादिवशी भारत बंद होता. त्यावेळी रेखाने आधल्या दिवशीच सेटवर रात्र जागून काढली आणि ते शूटिंग पूर्ण करण्यास सहकार्य दर्शवले होते. ही गोड आठवण सुषमा शिरोमणी हे तर काहीच नाय या मंचावर शेअर करताना दिसणार आहेत. भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाट भानू, गुलछडी अशा दमदार चित्रपटातून सुषमा शिरोमणी डॅशिंग नायिका साकारताना दिसल्या होत्या.
खेडोपाडी जत्रा यात्रांमध्ये त्यांच्या हाणामारीच्या सिनला शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडायचा. विशेष म्हणजे आपल्या चित्रपटातून त्यांनी हिंदी कलाकारांना देखील नाचवलं आहे. भिंगरी चित्रपटात अरुणा इराणी, फटाकडी चित्रपटातून रेखा, गुलछडी चित्रपटातून रती अग्निहोत्री, भन्नाट भानू मध्ये मौसमी चॅटर्जी आणि मोसंबी नारंगी चित्रपटातून जितेंद्र यांना त्यांनी नाचवलं आहे. सुषमा शिरोमणी यांनी मराठी चित्रपट सृष्टीत मोजक्याच चित्रपटातून काम केलं असलं तरी त्यांच्या चित्रपटातल्या दमदार भूमिका प्रसिद्धी मिळवून गेल्या आहेत. अभिनया सोबतच त्यांनी दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन क्षेत्रात देखील धडाकेबाज कामगिरी केली होती. मराठी चित्रपटासोबतच त्यांनी प्यार का कर्ज या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली.
यात मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र, नीलम आणि मीनाक्षी शेषाद्री सारख्या आघाडीच्या कलाकारांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली.अरुण शांडील याच्याशी त्या विवाहबंधनात अडकल्या आहेत. मधल्या काळात त्या इम्पा या चित्रपट निर्मिती संघटनेत कार्यरत होत्या. याशिवाय ऑस्कर अवॉर्डच्या त्या चेअरपर्सन म्हणून काम करत होत्या. त्यावेळी ऑस्कर पुरस्कारासाठी लगान चित्रपटाला त्यांनी प्राधान्य दिले होते. त्यावेळी अशोका चित्रपटाला हा पुरस्कार मिळावा म्हणून शाहरुख खानने सुषमा शिरोमणी यांच्याकडे खूप विनंती केली होती. मात्र मी माझं इमान त्यावेळी पूर्णपणे राखून हा पुरस्कार लगान चित्रपटासाठी देऊ केला, अशी आठवण सुषमा शिरोमणी यांनी यावेळी सांगितली आहे.