घराचा आणि बिझनेसचा ताबा शालिनीने घशात घालण्याच्या खटाटोपात केल्याचे आत्तापर्यंतच्या भागात पाहायला मिळाले. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्के कुटुंबाला तालावर नाचवत सर्व संपत्ती मिळवण्यासाठी जयदीपसोबत कबड्डीचा डाव आखला असल्याने मालिका खूपच रंजक वळणावर आली आहे. सर्व संपत्ती पुन्हा हवी असल्यास जयदीपला कबड्डीचा खेळ जिंकावा लागेल अशी अट शालिनीने ठेवली आहे.

लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं सध्या कबड्डीच्या अटीमुळे रंगतदार वळणावर पोहचली आहे. हा एकच पर्याय शिल्लक असल्याने सर्वांनी याला तयारी दाखवली आहे पण कबड्डीच्या खेळाचा सराव करण्यासाठी त्यांना आता कोच लागणार आहे. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे कबड्डी प्रशिक्षक म्हणून या मालिकेत स्पेशल एंट्री करणार आहेत. अभिनेते मिलिंद यांनी मालिकेविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे, “सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आणि या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. भैरु या प्रशिक्षकाच्या व्यक्तिरेखेची भूमिका साकारण्यासाठी मला संधी मिळाली याचा आनंद होत आहे. शाळेत असल्यापासून नाटक क्षेत्रातच मी काम केलं आहे. मला क्रिकेट खेळायला आवडतं पण मला कबड्डी फारशी येत नाही त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.”

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका दरम्यानच्या काळात खूपच गाजली गिरीजा प्रभू, मंदार जाधव, सुनील गोडसे, वर्षा उसगांवकर, कपिल होनराव, माधवी निमकर, संजय पाटील, मीनाक्षी राठोड, अभिषेक गावकर, आशा ज्ञाते, सायली साळुंखे, अपर्णा गोखले, गणेश रेवडेकर या अनुभवी कलाकारांचे विविधांगी अभिनय प्रेक्षकांच्या अपेक्षांना पात्र ठरत आहे. त्यातच मुरलेले कलाकार मंडळी नव्याने सहभागी होऊन मालिका आणखीनच रंगतदार बनवत आहेत. आता या कबड्डीच्या सामन्याचा सराव आणि प्रत्यक्ष खेळात नक्की काय घडेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची आतुरता निर्माण झाली आहे.