ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुलगा कौस्तुभ, सुषमा, सुवर्णा या दोन मुली नातवंडं असा त्यांचा परिवार आहे. जयंत सावरकर यांची प्रकृती वृद्धापकाळाने खालावली होती, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे समोर आले आहे. जयंत सावरकर हे ८८ वर्षांचे होते. ६० च्या दशकात त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले होते. रंगकर्मी मामा पेंडसे हे त्यांचे सासरे होत. अभिनयाची आवड असलेल्या जयंत सावरकर यांनी या क्षेत्रात येऊ नये म्हणून घरच्यांनी त्यांना विरोध केला होता.
मात्र सासरे मामा पेंडसे यांनी अभिनय करायचा असेल तर नोकरी सोडायची नाही अशी तंबी दिली होती. त्यामुळे रंगभूमीच्या पडद्यामागे राहून मिळेल ती कामं त्यांनी करण्यास सुरुवात केली. अगदी डोअर किपिंग असो, हिशोब करणे असो किंवा पार्श्वसंगीत देणं असो या सगळ्या गोष्टी ते शिकत गेले. त्यावेळी सुशिक्षित मंडळी नाटकातून काम करत त्यांच्या सहवासात राहून जयंत सावरकर यांना अभिनयाचे बारकावे शिकता आले. जयंत सावरकर यांनी एकच प्याला मधील तळीराम अशी किंवा अपराध मीच केला मधले गोळे मास्तर अशा विओढ भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने सहजसुंदर निभावल्या होत्या. मराठी नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांनी हिंदी चित्रपटातही उत्तम भूमिका केल्या.
वास्तव, सिंघम, समुद्र अशा बॉलिवूड चित्रपटात ते झळकले होते. ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या कारकिर्दीत चतुरंग प्रतिष्ठानने साजरा केलेला सहस्रचंद्रदर्शन सोहळा अविस्मरणीय ठरला होता. २०१६ साली विष्णूदास भावे पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, मास्टर नरेश पुरस्कार तसेच २०१८ साली महाराष्ट्र सरकारतर्फे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. १०० हुन अधिक नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या महान कलाकार जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.